मुरबाड : मुरबाड तालुक्यात मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने अनेक रस्ते पाण्याखाली गेले आहेत. मुरबाड शहरातील विद्यानगरात घरात पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. पाणी साचलेल्या ठिकाणी मुरबाड नगरपंचायतीच्या वतीने गटार खोदुन पाणी काढण्याचे काम युध्द पातळीवर सुरू करण्यात आले आहे.
पावसाळा आला की शहरात पाणी तुंबते आणि शासकिय यंत्रणा जागी होते हे नित्याचे झाले आहे. हेच चित्र या पावसाळ्यातही दिसून येत असल्याने नागरीकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
गेले 24 तास मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने मुरबाड-कल्याण महामार्गावरील किशोर या गावाच्या परिसरात रस्ता पाण्याखाली गेल्याने कल्याण-मुरबाड वाहतुक बंद करण्यात आली आहे. तालुक्यातील न्याहाडी रस्त्यावर झाड पडल्याने व रस्ता पाण्याखाली गेल्याने या मार्गाचीही वाहतूक ठप्प झाली आहे.
दरवर्षी विद्यानगर भागात पावसाचे पाणी घरात शिरून आर्थिक नुकसान होत असते. तरीही शासकीय यंत्रणा कोणतीही ठोस पावले उचलत नसल्याने नागरीकांकडून संत्ताप व्यक्त केला जात आहे. या भागात पाणी साचल्याने झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी नगराध्यक्ष राम दुधाळे, नगरपंचायतीचे मुख्याधिकारी परितोष कंकाळ, नायब तहसीलदार शंकर कोरवी यांनी हजेरी लावली होती. साचलेले पाणी काढण्यासाठी उपनगराध्यक्षा सौ. देसले यांचे पती मनोज देसले हे स्वतः भर पावसात दोन जेसीबीच्या सहाय्याने तात्पुरत्या स्वरूपात गटार खोदून साचलेले पाणी हटविण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसून आले.