ठामपा आयुक्तांचे दक्षतेचे निर्देश
ठाणे: पावसाळ्यामध्ये विविध साथीचे आजार तसेच डेंग्यू, मलेरिया या आजाराचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असते. असे आजार उद्भवू नये व उद्भवल्यास त्यावर वेळीच प्रतिबंधात्मक उपाय करण्याच्या दृष्टीने महापालिकेच्या आरोग्य यंत्रणेने सज्ज रहावे, असे निर्देश ठामपा आयुक्त अभिजित बांगर यांनी आरोग्य यंत्रणेस दिले.
सद्यस्थितीत ठाणे महापालिकेच्या सर्व आरोग्यकेंद्रात डेंग्यू आणि मलेरिया या आजारांच्या चाचण्या केल्या जात असल्या तरी महापालिकेची प्रसुतीगृहे, वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना येथे देखील तातडीने या चाचण्या सुरू कराव्यात. तसेच विविध साथीच्या आजारासाठी रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेल्या रुग्णांना कोणत्याही तपासणीसाठी बाहेर जावे लागणार नाही या दृष्टीने नियोजन करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी आज झालेल्या आढावा बैठकीत आरोग्य विभागाला दिले.
मागील काही दिवसात महापालिका कार्यक्षेत्रात डेंग्यू व मलेरियाचे रुग्ण आढळून आले आहेत. यात डेंग्यूचे 7 तर मलेरियाचे 35 रुग्ण आढळून आले आहेत पैकी काही रुग्ण उपचारानंतर घरी गेले असून काहींवर उपचार सुरू असल्याचे आरोग्य विभागाकडून बैठकीत सांगण्यात आले.
डेंग्यू आणि मलेरिया हे गंभीर आजार असून या आजारांकडे दुर्लक्ष न करता जर एखाद्या व्यक्तीला या आजारांची लक्षणे आढळली तर त्या रुग्णाला चाचणी करण्यासाठी ठाणे महापालिकेच्या आरोग्य केंद्रात जाण्याचा सल्ला द्यावा. अशा सूचना ठाणे शहरातील सर्व खाजगी डॉक्टर्सना देत असतानाच संबंधित रुग्णांचे संपर्क क्रमांकही ठाणे महापालिकेच्या आरोग्य विभागास द्यावेत, असे निर्देश आयुक्तांनी यावेळी दिले.
छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात डेंग्यू, मलेरियांच्या रुग्णांसाठी स्वतंत्र कक्ष तयार करावा. तसेच डॉक्टर्स, नर्सेस, वॉर्डबॉय यांची कमतरता पडता कामा नये. रुग्णांना देण्यात येणाऱ्या औषधांचा आवश्यक साठा उपलब्ध करुन ठेवण्याच्या सूचनाही आयुक्तांनी यावेळी दिल्या. छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात रक्ताच्या चाचण्या केल्यानंतर सदर रुग्णास प्लेटलेटसची आवश्यक असल्यास त्याचे नियोजन करावे तसेच रक्तदात्यांची यादीही तयार करावी. कोणत्याही परिस्थितीत रुग्णाला कोणत्याही तपासणीसाठी बाहेर पाठवू नये तसेच डेंग्यूची लागण झालेल्या रुग्णांना जर प्लेटलेट देण्याची गरज पडली तर सदर प्लेटलेटची उपलब्धता छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयामार्फतच केली जाईल व कोणत्याही रुग्णास रुग्णालयाच्या बाहेरुन खाजगी माध्यमातून प्लेटलेटस आणण्यासाठी सांगितले जाणार नाही हे सुनिश्चित करावे, अशा सक्त सूचना आयुक्त श्री. बांगर यांनी वैद्यकीय अधिष्ठाता डॉ. राकेश बारोट यांना दिल्या. तसेच रुग्णालयातील आयसीयू कक्ष कमी पडणार नाही या दृष्टीने नियोजन करावे.
परिसरात धूर आणि औषध फवारणी करुन घ्यावी. डेंग्यूचे डास हे स्वच्छ पाण्यात तयार होत असल्यामुळे पाण्याची साठवणूक होणार नाही, साठविलेले पाणी कपड्याच्या साहाय्याने झाकून ठेवावे, तसेच दर सात दिवसांनी पाणी भरलेली भांडी रिकामी करुन कोरडा दिवस पाळण्याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात यावी. ज्या परिसरात विहीरी, बोअरवेलच्या माध्यमातून पाण्याचा वापर केला जातो अशा विभागांमध्ये पाण्याची चाचणी करावी, ते पाणी पिण्यायोग्य आहे की नाही याबाबतची तपासणी करावी. जर पाणी पिण्यायोग्य नसेल त्या विभागात पाणीपुरवठा विभागाच्या माध्यमातून व्यवस्था केली जाईल असेही आयुक्त श्री. बांगर यांनी नमूद केले.
ज्या ठिकाणी इमारतीचे बांधकाम सुरू आहेत, त्या ठिकाणी सर्व्हे करुन जर डासांची उत्पत्ती आढळून आली तर संबंधित बांधकाम विकासकाला जास्तीत जास्त दंड आकारावा, गृहसंकुले, आस्थापना आदी भागात जनजागृती करावी, असे निर्देश आयुक्तांनी दिले.
या बैठकीस अतिरिक्त आयुक्त 1 संदीप माळवी, उपायुक्त उमेश बिरारी, वैद्यकीय अधिष्ठाता डॉ. राकेश बारोट, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. चेतना नितिल आदी उपस्थित होते.