पिवळ्या रेशनकार्डासाठी ‘तो’ चढला मोबाईल टॉवरवर

शहापूर: वारंवार हेलपाटे मारूनही शहापूर तहसीलदार कार्यालयामधील पुरवठा विभागाकडून पिवळे रेशनकार्ड मिळत नसल्याने माहूली काटेकुई येथील संतप्त झालेल्या रामचंद्र ठाकरे या 50 वर्षीय व्यक्तीने तहसीलदार कार्यालयासमोर असलेल्या मोबाईल टॉवरवर चढून निषेध केला. सुदैवाने जीवरक्षक पथक आणि पोलीस प्रशासनाने प्रसंगावधान राखून त्याची सुटका केली.

शहापूर तालुका हा आदिवासीबहुल तालुका असल्याने आजही तालुक्यात राहणारे बहुसंख्य आदिवासी बांधव शासनाच्या विविध योजनांपासून वंचित आहेत. मात्र त्यांच्यात रामचंद्रसारखे धाडस करण्याची हिंमत नाही. रामचंद्रने केलेले धाडस योग्य नाही, त्याचे आम्ही समर्थन करत नाही परंतु त्याला हे धाडस करण्यासाठी प्रवृत्त करणाऱ्या मुजोर अधिकाऱ्यांनी यापुढे हा धडा घेऊन आदिवासी बांधवांशी सौजन्याने वागून त्यांना योग्य तो न्याय द्यावा अशी मागणी तालुक्यातून होत आहे.

या व्यक्तीने पिवळे रेशनकार्ड मिळण्यासाठी कोणत्याही प्रकारचा अर्ज सादर केला नसल्याचे पुरवठा अधिकारी योगिता सत्यागिरी यांनी बोलतांना सांगितले. तसेच त्यांचे मानसिक स्वास्थ्य बरोबर असल्याचे वाटत नाही, असेही त्या म्हणाल्या.