ठाणे : सीसीटीव्ही फुटेजचा माग काढत कोणत्याही प्रकारचे धागेदोरे नसताना ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी नौपाडा येथे लाखोंची रोकड आणि सोन्याचे दागिने चोरणाऱ्या चोरट्याला बेड्या ठोकल्या आहेत.
पाचपाखाडी भागातील जयवंत सोसायटी येथे ९ मार्च रोजी दुपारी स्वीगीच्या डिलिव्हरी बॉयच्या वेशात येऊन मुलाला चाकूचा धाक दाखवून घरातील बारा लाखाची रोकड आणि पाच लाखांचे दागिने चोरट्याने चोरून नेले होते. त्याबाबत नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा समांतर तपास ठाणे गुन्हे शाखेचे पोलीस करत होते.
पोलिसांनी चोरी करून चोरटे ज्या दिशेने पळून गेले होते, त्याचा तपास करून त्या मार्गावरील ५०पेक्षा जास्त सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. संशयित आरोपीचे कपडे, गाडी याची माहिती घेऊन अभिषेक देडे (१९) या चोरट्याला अटक केली. त्याचा एक साथीदार जय भगत फरार आहे. या चोरट्याला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी नौपाडा पोलिसांच्या ताब्यात पुढील तपास करण्यासाठी देण्यात आले आहे.