आयपीएलच्या पंधाराव्या हंगामातील २० व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा दणदणीत विजय झाला असून लखनऊला पराभवाचा सामना करावा लागला आहे. राजस्थानने दिलेले १६६ धावांचे लक्ष्य गाठताना लखनऊनची दाणादाण उडाली. त्यामुळे राजस्थानचा 3 धावांनी विजय झाला आहे. शिमरोन हेटमायरने केलेली धडाकेबाज फलंदाजी आणि युजवेंद्र चहलने केलेल्या दिमाखदार गोलंदाजीच्या जोरावर राजस्थानने या विजयाला गवसणी घातली.
राजस्थानने दिलेल्या १६६ धावांचे लक्ष्य गाठण्यासाठी मैदानात उतरलेल्या लखनऊ सुपर जायंट्स संघाची सुरुवात अतिशय खराब झाली. डावाच्या पहिल्याच षटकात पहिल्या आणि दुसऱ्या चेंडूवर अनुक्रमे केएल राहुल आणि कृष्णाप्पा बाद झाले. राहुल त्रिफळाचित तर दुसऱ्या विकेटसाठी आलेला कृष्णाप्पा पायचित झाला. हे दोन्ही फलंदाज शून्यावर बाद झाल्यामुळे सुरुवातालीच लखनऊवर दवाब निर्माण झाला. त्यानंतर तिसऱ्या विकेटसाठी आलेल्या जेसन होल्डरने फक्त आठ धावा केल्या. होल्डर बाद झाल्यानंतर लखनऊनची १४ धावांवर तीन गडी बाद अशी दयनीय स्थिती झाली. त्यानंतर मात्र दीपक हुडा आणि सलामीला आलेला क्विंटन डी कॉकडने संघाला सावरण्याचा प्रयत्न केला. दीपक हुडाने २४ चेंडूमध्ये २५ धावा केल्या. त्यानंतर दहाव्या षटकामध्ये कुलदीपच्या चेंडूचा सामना करताना दीपक त्रिफळाचित झाला.
आतापर्यंतच्या सामन्यांत धमाकेदार फलंदाजी करणाऱ्या आयुष बदोनीचीही जादू चालू शकली नाही. तो अवघ्या पाच धावा करु शकला. बदोनीनंतर सलामीला आलेला डी कॉकडेखील झेलबाद झाला. त्याने ३९ धावा केल्या. त्यानंतर कृणाल पांड्याने २२ धावा करत संघाला १६६ धावांपर्यंत घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. कृणाल पांड्याला युजवेंद्र चहलने त्रिफळाचित केलं. मार्कस स्टॉईनिस आणि छमेरा अनुक्रमे ३८ आणि १३ धाावंवर बाद झाले. शेवटच्या षटकात १५ धावांची गरज होती. मात्र लखनऊ या धावा करण्यात अयशस्वी झाला. परिणामी लखनऊचा तीन धावांनी पराभव झाला. याआधी नाणेफेक जिंकल्यानंतर लखनऊ सुपर जायंट्सने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर राजस्थान रॉयल्स संघातर्फे जोस बटलर आणि देवदत्त पडिक्कल सलामीला उतरले. दोघेही चांगली खेळी करु शकले नाहीत. जोस बटलर आवेश खानने टाकलेल्या चेंडूवर त्रिफळाचित झाला. देवदत्त पडिक्कल २९ धावांवर असताना झेलबाद झाला. त्यानंतर कर्णधार संजू सॅमसन आणि वॅन दर डुसेन हे दोन्ही फलंदाज लगेच बाद झाले. संजू सॅमसनने १३ धावा केल्या. तर डुसेनला फक्त चार धावा करता आल्या.
चौथ्या विकेटसाठी आलेल्या शिमरोन हेटमायरने मात्र धडाकेबाज फलंदाजी करत लखनऊच्या गोलंदाजांना सळो की पळो करून सोडले. त्याने ३६ चेंडूंमध्ये सहा षटकार आणि एक चौकरच्या मदतीने ५९ धावांचा नाबाद अर्धशतकी खेळ केला. अश्विनने रिटायर्ड आऊटचा निर्णय घेतल्यामुळे तो २३ धावा करु शकला. त्यानंतर फलंदाजीसाठी आलेला रियान पराग आठ धावांवरच बाद झाला. तर ट्रेंट बोल्टने नाबाद दोन धावा केल्या. वीस षटकांचा खेळ होईपर्यंत राजस्थानने १६५ धावा केल्या.