चित्रपटाला समर्थन देणारे महाराष्ट्रद्रोही-आव्हाड
ठाणे: ‘हर हर महादेव’ या मराठी चित्रपटावरून राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसेमध्ये चांगलीच जुंपली आहे. काल राष्ट्रवादीने ठाण्यात या चित्रपटाचा खेळ बंद पाडल्यानंतर मनसेने तो पुन्हा सुरू केला. एवढेच नाही तर मंगळवारी सायंकाळी मोफत खेळ ठेवून राष्ट्रवादीला खुले आव्हान दिले आहे. तर चुकीचा इतिहास मांडणाऱ्या चित्रपटाला समर्थन देणारे महाराष्ट्र द्रोहीच म्हणावे लागतील, असा उलट टोला राष्ट्रवादीचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी लगावला आहे.
इतिहासाची मोडतोड केल्याच्या निषेधार्थ सोमवारी रात्री विवियाना मॉलमध्ये सुरु असलेला चित्रपटाचा खेळ राष्ट्रवादीने बंद पाडला. मात्र अवघ्या काही मिनिटातच मनसेने याठिकाणी धाव घेऊन हा शो पुन्हा सुरु केला. त्यामुळे ठाण्यात राष्ट्रवादी विरुध्द मनसे असा सामना रंगल्याचे चित्र निर्माण झाले आहे. असे असतांनाच मंगळवारी सांयकाळी मनसेने त्याच मॉलमध्ये दोन स्क्रीन या चित्रपटासाठी आरक्षित केल्या असून ठाणेकरांना या चित्रपटाचा मोफत खेळ दाखविणार आहे. ज्यांचा या चित्रपटाला विरोध आहे त्यांनी हिम्मत असेल तर खेळ बंद करुन दाखवाच, असा थेट इशारा मनसेने राष्ट्रवादीला दिला आहे.
या चित्रपटात नेमके काय आहे, हे प्रेक्षकांना सुध्दा कळू दे, त्यांना देखील उत्सुकता आहे, या चित्रपटात नेमके काय आहे, त्यामुळे आम्ही हा खेळ मोफत लावला असल्याची माहिती मनसेचे ठाणे-पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी दिली. ज्यांना विरोध करायचा असेल त्यांनी यावे, विरोधाला विरोध करायला आम्हालाही येतो, असा इशाराही त्यांनी दिला. एकूणच मनसेने या चित्रपटाच्या माध्यमातून राष्ट्रवादीला थेट आव्हान दिल्याचेच दिसत आहे.
चित्रपटातून खोटा इतिहास
शिवरायांचा चुकीचा इतिहास दाखवणाऱ्या चित्रपटाला समर्थन देणारे महाराष्ट्रद्रोही आहेत. ‘हर हर महादेव’ या सिनेमात विकृतीचा कळस गाठण्यात आला आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे नेते डॉ.जितेंद्र आव्हाड यांनी दिली.
चित्रपटात बाजीप्रभू देशपांडे हे महाराजांचे चक्क एकेरी नाव घेत त्यांच्याशी युद्ध करत आहेत. एका स्वामीनिष्ठ मावळ्याचा हा केवढा अपमान आहे! या सिनेमात बाजीप्रभू ही व्यक्तिरेखा खुद्द महाराजांपेक्षाही मोठी दाखवली आहे. महाराजांना प्रत्येक गोष्ट जणू काही बाजीप्रभूच शिकवत होते आणि महाराजांना, जिजाऊंना किंवा इतर दरबारी लोकांना काहीच माहीत नव्हते इतक्या दर्जाचा हा विपर्यास आहे. मराठ्यांचा इतिहास विकृत करण्याचे काम निर्माते-दिग्दर्शक करत असल्याचा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.
युवराज संभाजीराजे छत्रपती यांच्यासारख्या महाराजांच्या वंशजांनी ह्या गोष्टीची गंभीर दखल घ्यावी इतके हे प्रकरण हाताबाहेर गेले आहे. ही विषवल्ली इथेच ठेचली गेली नाही तर येत्या काळात नवी पिढी मराठ्यांचा खरा इतिहास कायमचा विसरून जाईल, अशी भीती श्री.आव्हाड यांनी व्यक्त केली आहे.
विवियाना मॉलमध्ये ‘हर हर महादेव’ या चित्रपटाचा खेळ बंद पाडण्यासाठी गेल्यानंतर एका प्रेक्षकाला मारहाण केल्याप्रकरणी राज्याचे माजी गृहनिर्माणमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यासह सुमारे १०० कार्यकर्त्यांविरुद्ध ठाण्यातील वर्तकनगर पोलीस ठाण्यात मंगळवारी गुन्हा दाखल झाला आहे