अंबरनाथ शिवमंदिरात ‘हर हर महादेव’

अंबरनाथ: यंदा अधिक श्रावण महिन्यानंतर आलेल्या श्रावणातील पहिल्याच सोमवारी अंबरनाथच्या प्राचीन शिवमंदिरात भाविकांची अलोट गर्दी झाली होती.

आज पहिलाच श्रावणी सोमवार असल्याने शिवमंदिरात महादेवाच्या दर्शनासाठी आज सकाळपासूनच भाविकांनी मंदिर परिसरात दूरपर्यंत रांगेत उभे राहून दर्शन घेतले. श्रावण महिन्यानिमित्ताने कोळी समाज, पुजारी पाटील परिवार यांच्या पुढाकारातून श्रावण हिंदू धर्म संस्कृती संवर्धन महोत्सवाचे आयोजन केले जाते. महोत्सवाचे यंदाचे २२ वे वर्ष आहे. या कालावधीत रुद्र अभिषेक, भजन कीर्तन, प्रवचन, नित्यआरती , दुपारी महाभोजन यासारख्या विविध धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल आहे.

आज पहिल्याच श्रावणी सोमवारी आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी सकाळी मंदिरात जाऊन महादेवाचे दर्शन घेतले. मागील महिन्यापासून विविध धार्मिक कार्यक्रमांमुळे मंदिर परिसर गजबजून गेला आहे. भाविकांनी शांततेत महादेवाचे दर्शन घ्यावे, असे आवाहन मंदिराचे पुजारी रवी पाटील यांनी केले.