एप्रिलपासून हापूस आंबा निर्यातीला सुरुवात

संग्रहित

चार हजार मेट्रिक टनचे लक्ष्य

नवी मुंबई: दरवर्षी एपीएमसी बाजारातून परदेशात हापूस आंबा निर्यात केला जातो. निर्यातीआधी आंब्यावर प्रकिया केली जाते, त्यानंतरच एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासून निर्यातीला सुरुवात होणार आहे.

दरवर्षी आंब्याचा खरा हंगाम मार्च महिन्यात सुरू होतो तर फेब्रुवारीपासून हापूस दाखल होण्यास सुरुवात होते. देशांतर्गत आंब्याची मागणी असते, त्याचबरोबर परदेशातूनही हापूस आंब्याला मोठी मागणी असते. आखाती देश, लंडन, ऑस्ट्रेलिया, कुवेत, युरोपियन देश, जपान, दक्षिण कोरिया या ठिकाणी कोकणातील हापूस आंब्याची निर्यात होते. परदेशात आंबा निर्यात करण्यासाठी नियमांच्या चौकटीतून आंबा निर्यात करावी लागते. आंबा निर्यातीकरीता आंब्याचा आकार, वजन आणि दर्जा महत्वाचा असतो. आंब्याची गुणवत्ता तपासणी करून, विशिष्ट तापमान ठेवून दीर्घकाळ टिकण्यासाठी विविध प्रक्रियेतून आंब्याला जावे लागते, त्यांनतर त्याची निर्यात करण्यात येते. देशातून होणाऱ्या एकूण आंबा निर्यातीत दरवर्षी ८० ते ८५ टक्के वाटा महाराष्ट्राचा असतो. महाराष्ट्र शासनाच्या कृषि पणन मंडळ सुविधा केंद्रातून विशेष प्रकारच्या प्रक्रियेतून हापूस निर्यात होते. (व्हेपर हीट ट्रीटमेंट) उष्ण बाष्प प्रक्रिया, उष्णजल प्रक्रिया (हॉट वॉटर ट्रीटमेंट) आणि विकिरण प्रक्रिया (इरेडिएशन ) मधून आंब्याची प्रक्रिया होऊन त्या त्या देशात निर्यात केला जातो. कृषी पणन मंडळाच्या विभागातून राज्यातील आंबा निर्यात वाढत आहे. परदेशात जपान, दक्षिण कोरिया आणि युरोपियन देशात हापूस बरोबर केसर, तोतापुरी, सुवर्णरेखा, बेगनपल्ली यांची निर्यात होत असते.

अमेरिकेत आंबा निर्यात करण्याआधी
अमेरिकन निरीक्षक कृषी पणन मंडळाच्या विकिरण सुविधा केंद्रावर १ एप्रिलपासून उपलब्ध राहणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत आंब्याचे डोज मॅपिंग करण्यात येणार असून प्रत्यक्ष आंबा निर्यात एप्रिलपासून करण्यात येणार आहे.

चालू वर्षी निर्यातदारांच्या अपेक्षा पाहता कृषी पणन मंडळाच्या वी किरण, वीपीएफ व बीएचटी या तीन सुविधा केंद्रावरून सुमारे साडेतीन हजार मेट्रिक टन आंबा निर्यातीचे नियोजन करण्यात आलेले आहे. तसेच महाराष्ट्र व्यतिरिक्त केरळ, कर्नाटक व गुजरात या राज्यातील निर्यातदारसुद्धा वी किरण सुविधा केंद्रास भेट देत असून नवीन निर्यातदार या सुविधा केंद्राला जोडले जाणार आहेत.

सुविधांच्या वापरातून आंबा निर्यातीचे चार हजार मेट्रिक टनचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. युरोपियन देशांत १७१० मेट्रिक टन, अमेरिका १३०० मेट्रिक टन, न्यूझिलंड. २०० मेट्रिक टन, ऑस्ट्रेलिया ७५ मेट्रिक टन, जपान ७० मेट्रिक टन, दक्षिण कोरिया १० मेट्रिक टन असे एकूण ३३६५ मेट्रिक टन निर्यातीचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.

परदेशात आंबा निर्यात करण्यापूर्वी त्यावर प्रकिया करून त्याची गुणवत्ता तपासली जाते. सध्या आखाती देशातून मागणी अधिक आहे. त्यामुळे लवकरच आंबा निर्यातीला सुरुवात होणार आहे, अशी माहिती आंबा निर्यातदार मोहन डोंगरे यांनी दिली.