ठाणे स्थानकात प्रवाशांची लटकंती

ठाणे : मध्य रेल्वेतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे रोजच हाल होत असून सोमवारी संध्याकाळी 8 च्या सुमारास डाऊन मार्गावर जाणाऱ्या लोकल सुमारे 20 मिनिटे उशिराने आल्याने ठाणे रेल्वे स्थाकात प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली होती. गाडी पकडण्यासाठी प्रवाशांची अक्षरशः झुंबड उडाली. त्यामुळे अनेक प्रवाशांना दारातच लटकून प्रवास करावा लागला. बराच वेळ हा गोंधळ सुरू होता.

सोमवारी संध्याकाळी मध्य रेल्वेच्या प्रवाशांना पुन्हा एकदा उशिरा येणाऱ्या लोकलचा फटका बसला. कर्जत, कसारा, डोंबिवली या डाऊन मार्गावर जाणाऱ्या लोकल सुमारे 20 मिनिटे उशिरा ठाणे स्थानकात येत होत्या. पावसामुळे लोकल उशिराने धावत होत्या. ऐन संध्याकाळी हा गोंधळ उडाल्याने ठाणे स्थानकाच्या फलाट क्रमांक 2 आणि 5 वर प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली होती. बराच वेळ हा गोधळ सुरू होता, त्यामुळे प्रवाशांनी रेल्वे प्रशासनावर आगपाखड केली.