ठाणे : दिव्यात जितीया व्रतासाठी उत्तर भारतीय महिलांची गणेश नगर तलाव परिसरात एकच झुंबड उडाली होती. भाजपाचे शहर उपाध्यक्ष नरेश पवार आणि सौ.रेश्मा पवार यांनी या कार्यक्रमाचे उत्तम नियोजन केले होते.
कोरोनापासून उसंत मिळाल्यानंतर दोन वर्षांनी दिवा शहरातील गणेश तलाव येथे महिलांनी मोठी गर्दी केली होती. अपत्यांच्या सुरक्षिततेसाठी, उत्तम संतती प्राप्तीसाठी, गर्भधारणा सुरक्षित राहण्यासाठी, मुलांच्या जीवनात सुखसमृद्धी येण्यासाठी जिमूतवाहन मूर्तीची पूजा केली. महाभारताच्या युद्धात द्रोणाचार्य मारले गेल्यावर त्यांचा मुलगा अश्वत्थामा क्रोधित झाला आणि त्याने ब्रह्मास्त्र सोडले, त्यामुळे अभिमन्यूची पत्नी उत्तराच्या पोटी जन्मलेले मूल नष्ट झाले. भगवान श्रीकृष्णाने त्याला पुनर्जीवन दिले. तेव्हापासून माता आपल्या मुलांच्या दीर्घायुष्यासाठी हे व्रत पाळू लागल्या, अशी आख्यायिका आहे.
या व्रतानिमित्त भारतीय जनता पार्टीचे ठाणे जिल्हा उपाध्यक्ष नरेश पवार आणि रेश्मा पवार यांनी उत्तरभारतीयांसाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात हजारो महिलांनी सहभाग घेतला. व्रत करणाऱ्या अनेक महिलांचे पुष्पगुच्छ, शाल, श्रीफळ देऊन स्वागत केले. यावेळी ठाणे जिल्हा उपाध्यक्ष नरेश पवार, रेश्मा पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विविध योजनांची माहीती पत्रके वाटली. पंतप्रधान मोदी यांच्या योजना कशा वाटल्या याबद्दल नागरिकांनी प्रतिक्रिया देण्यासाठी पोस्ट कार्डही वाटले.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उत्तर भारतीय मोर्चाचे अध्यक्ष शैलेश मिश्रा, उपाध्यक्ष अमरनाथ गुप्ता, उपाध्यक्ष जिलाजीत तिवारी, उपाध्यक्ष समशेर यादव, आदी मान्यवर उपस्थित होते.