मुंब्य्रातील नराधम आसिफ मन्सुरीला फाशी द्या

आ. निरंजन डावखरे यांच्या समवेत नागरीकांची पोलीस ठाण्यावर धडक

ठाणे : मुंब्य्रात दहा वर्षीय मुलीवर अत्याचार करून धारदार शस्त्राने हत्या करीत तिला सहाव्या मजल्यावरून खाली फेकणाऱ्या नराधम आसिफ मन्सुरी याच्या घृणास्पद प्रकाराचे सर्वत्र पडसाद उमटत असून संताप व्यक्त होत आहे.

भाजपचे कोकण पदवीधर मतदार संघाचे आ. निरंजन डावखरे यांच्या समवेत शेकडो नागरीकांनी बुधवारी मुंब्रा पोलीस ठाण्यात धडक दिली. तसेच, हा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवुन नराधमाला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली. यावेळी आ. डावखरे यांनी मुंब्य्रातील ड्रग्ससह अवैध कृत्यांचा पाढाही पोलीस उपायुक्त सुभाष बोरसे यांच्यासमोर वाचला.

मुंब्य्राच्या ठाकूरपाडा परिसरात सोमवारी १० वर्षीय मुलीचे अपहरण करून अत्याचार करीत तिला सहाव्या मजल्यावरून खाली फेकल्याची संतापजनक घटना घडल्यानंतर मुंब्यात हिंदु संघटना आक्रमक झाल्या आहेत. माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या घटनेच्या निषेधार्थ मुंब्य्रात शेकडोंच्या संख्येने नागरीक रस्त्यावर उतरले. आ. निरंजन डावखरे यांनी तातडीने मुंब्र्यात धाव घेतली. तसेच पोलीस उपायुक्त सुभाष बुरसे आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांची भेट घेऊन चर्चा केली. आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी आणि पीडित मुलीला आणि तिच्या कुटुंबियांना न्याय मिळावा, अशी मागणी उपायुक्त बुरसे यांच्याकडे केली.

या घृणास्पद घटनेबाबत लोकांमध्ये तीव्र आक्रोश असून, अशा घटना समाजात घडू नयेत म्हणून ठोस पावले उचलण्याबाबत आ. डावखरे यांनी चर्चा केली. तसेच जनभावनेचा आदर करत, अशा प्रकारच्या घटना भविष्यात पुन्हा घडू नयेत याकरिता आरोपीवर कठोरात कठोर कारवाई करण्यासह आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी आ. डावखरे यांनी उपायुक्त सुभाष बुरसे यांच्याकडे केली.

यावेळी ठाणे जिल्हा भाजपा सरचिटणीस कुणाल पाटील, मनोहर सुगदरे, भाजप महिला मोर्चाच्या ठाणे अध्यक्षा स्नेहा पाटील, नाग्या तांबोळी आदीसह भाजपच्या महिला कार्यकर्त्या आणि मुंब्य्रामधील रहिवासी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.

अंमली पदार्थासह अवैध धंद्याकडे वेधले लक्ष

मुंब्रा येथे बऱ्याच ठिकाणी अवैध धंदे आणि बेकायदेशीरित्या अंमली पदार्थांचा राजरोस व्यापार चालू असल्याचे भाजपच्या कार्यकर्त्यांना आढळले आहेत. याकडे आ. निरंजन डावखरे यांनी पोलिसांचे लक्ष वेधले. मुंब्र्यातील ही सर्व ठिकाणे भाजपच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या निदर्शनास आणून दिली आहेत. मुंब्र्यामध्ये असे अनेक पॉईंट आहेत की या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने कामे चालतात. पोलिसांची दिशाभूल करून ड्रग्स आणि नार्कोटिक्सचे अड्डे देखील मुंब्य्रात चालवले जात असल्याकडे भाजपने लक्ष वेधले आहे.