मध्यवर्ती रुग्णालयाचे अधीक्षक डॉ मनोहर बनसोडे यांची मागणी
उल्हासनगर: उल्हासनगर महापालिकेच्या मध्यवर्ती रुग्णालयाच्या इमारतीला अनेक ठिकाणी तडे गेले असून अनेक ठिकाणी प्लास्टर पडलेले आहे. दुसरीकडे मनपा प्रशासनाने एक वर्षांपूर्वी बनविलेले पाच मजली अत्याधुनिक रुग्णालय हे धूळ खात पडले आहे. हे मध्यवर्ती रुग्णालय प्रशासनाच्या ताब्यात द्यावे, अशी लेखी मागणी मध्यवर्ती रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. मनोहर बनसोडे यांनी उल्हासनगर मनपा आयुक्त अजीज शेख यांच्याकडे केली आहे.
उल्हासनगरचे मध्यवर्ती रुग्णालय हे शासकीय रुग्णालय हे 1983 साली बांधण्यात आले आहे. सद्यस्थितीमध्ये रुग्णालयाच्या इमारतीमध्ये कॉलम, स्लॅब आणि बांधकामामध्ये मोठ्या प्रमाणात तडे गेलेले दिसून येत आहेत. रुग्णालयाकडील वेगवेगळ्या कक्षामध्ये प्लास्टर गळून पडणे, स्लॅबच्या भागाचे तुकडे गळून पडणे, पाण्याची गळती होणे अशा वारंवार घटना घडत आहेत.
याबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग यांना कळविण्यात आलेले असून या विभागाकडुन ३ सप्टेंबर २०२३ रोजी इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्यात आलेले असून अहवाल सादर करण्यात येईल असे सांगितलेले आहे. या रुग्णालयाचे श्रेणीवर्धन करुन २०२ खाटांवरुन ३५० खाटांच्या रुग्णालयाच्या इमारतीच्या बांधकामाचा प्रस्ताव शासनस्तरावर पाठविण्यात आलेला आहे.
स्ट्रकचरल ऑडिट रिपोर्ट येणे, शासनाला कळविणे, शासन स्तरावर पाठपुरावा करणे, शासनस्तरावरुन कार्यवाही होणे या बाबींसाठी बराच वेळ लागण्याची शक्यता नाकारता येत नसल्यामुळे आणि रुग्णालयामध्ये वारंवार प्लास्टर गळणे, स्लॅबचा भाग कोसळणे, पाणी गळती होणे, तडे जाणे अशा प्रकारामुळे ईमारतीबाबत भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे महानगरपालिकेची बंद स्थितीत असलेली म्हारळ गावाजवळील पाच मजली इमारत तात्पुरत्या स्वरुपात या रुग्णालयासाठी देण्यात यावी, जेणे करुन या रुग्णालयाकडील कांही विभाग त्या ठिकाणी हलवता येतील आणि भितीचे वातावरण देखील कमी होईल, असे निवेदनात म्हटले आहे.
या संदर्भात राज्याचे आरोग्य सेवा आयुक्तालयचे संचालक, उपसंचालक, सार्वजनिक बांधकाम विभाग यांना कळविण्यात आले असल्याचे डॉ. बनसोडे यांनी मनपा आयुक्त अजीज शेख यांना लिहिलेल्या पत्रात नमूद केले आहे.