मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर अनधिकृत रिसॉर्ट्सवर हातोडा

कर्मचाऱ्यांकडून मारहाणीत ठाकरे गटाचे मिलिन्द मोरे यांचा मृत्यू

ठाणे: ठाकरे गटाचे उपशहरप्रमुख मिलिंद मोरे यांचे रविवारी सायंकाळी विरार येथील सेवन सी बीच रिसॉर्टवर हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. मोरे यांचा मृत्यू रिसॉर्टवरील कर्मचार्‍यांशी झालेल्या वादानंतर मारहाणीमुळे झाल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबियांनी केला होता. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने विरार येथील सेवन सी बीच रिसॉर्टवर प्रशासनाने हातोडा चालवण्यास सुरूवात केली आहे. अन्य अनधिकृत रिसॉर्ट्सवर देखील कारवाई करण्यात येणार आहे.

शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख रघुनाथ मोरे यांचे पुत्र, उबाठा गटाचे माजी उपशहरप्रमुख आणि माजी परिवहन समिती सदस्य मिलिंद मोरे यांचे काल निधन झाले. काल आपल्या कुटूंबासह अर्नाळा बिच येथील रिसॉर्टवर गेले असता तिथे स्थानिक नागरिकांशी झालेल्या वादातून त्यांच्यावर हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात झालेल्या दुखापतीमुळे अचानक हृदयविकाराचा झटका येऊन त्यात त्यांचे निधन झाले. ही बातमी ठाण्यात वाऱ्यासारखी पसरली त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोरे यांच्या ठाण्यातील निवासस्थानी जाऊन त्यांचे अंत्यदर्शन घेतले. यावेळी कुटूंबियाकडून झालेला प्रसंग समजल्यावर मुख्यमंत्र्यांनी या घटनेची तत्काळ दखल घेऊन या भागातील सर्व अनधिकृत रिसॉर्टसवर हातोडा चालवण्याचे निर्देश वसई-विरार पालिका आयुक्तांना दिले.

त्यानुसार या भागातील रिसॉर्टसवर कारवाई सुरू झाली असून काही रिसॉर्टसचे बांधकाम पालिकेच्या वतीने जमीनदोस्त करण्यात आले आहे. या भागात अनधिकृतपणे सुरू करण्यात आलेल्या या रिसॉट्सच्या विरोधात स्थानिक नागरिकांनी अनेकदा पालिका प्रशासनाकडे तक्रार करून ती बंद करावीत अशी मागणी केली होती. मात्र आज अखेर मुख्यमंत्र्यांनी या रिसॉर्टसच्या विरोधात कारवाई करण्याचे निर्देश दिल्यानंतर या कारवाईला गती आली आहे. सकाळपासून पलिकेने या रिसॉर्टसह अनेक अनधिकृत रिसॉर्टसवर तोडक कारवाई केली असून ही कारवाई यापुढेही सुरू राहणार आहे.

मिलिंद मोरे यांचे पार्थिव सोमवारी सकाळी ठाण्यात आणल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले. मोरे यांच्या कुटुंबियांचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांत्वन केले. यावेळी माजी आमदार रविंद्र फाटक देखील उपस्थित होते.