कुंभारखाणपाडा हरितपट्ट्यातील बेकायदा इमारतींवर हातोडा

डोंबिवली: डोंबिवली पश्चिमेतील कुंभारखाणपाडा भागातील हरितपट्ट्यावर कल्याण-डोंबिवली पालिकेच्या बेकायदा बांधकाम परवानग्या बनवून, त्या आधारे महाराष्ट्र स्थावर संपदा विभागाचा रेरा नोंदणी क्रमांक मिळवून १० बेकायदा इमारतींची उभारणी करणाऱ्या भूमाफियांच्या बेकायदा इमारती जमीनदोस्त करण्याची कारवाई मंगळवारी पालिकेने सुरू केली. या कारवाईने पालिकेने माफियांना मोठा दणका दिला आहे.

मंगळवारी सकाळी आयुक्त डाॅ. भाऊसाहेब दांगडे, अतिरिक्त आयुक्त मंगेश चितळे, उपायुक्त सुधाकर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली परिमंडळ उपायुक्त स्वाती देशपांडे, ह प्रभागाचे साहाय्यक आयुक्त सुहास गुप्ते यांनी आपल्या पथकाच्या साहाय्याने ही तोडकामाची कारवाई सुरू केली. या कारवाईमुळे पर्यावरणप्रेमी, परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले. फ प्रभागाचे साहाय्यक आयुक्त भरत पाटील, ग प्रभागाचे साहाय्यक आयुक्त संजय साबळे यावेळी उपस्थित होते.

ह प्रभागाचे साहाय्यक आयुक्त गुप्ते, विष्णुनगर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि पालिकेच्या ५० हून अधिक तोडकाम पथकासह मंगळवारी सकाळी कुंभारखाणपाडा खाडी किनारी दाखल झाले. १० इमारतींच्या ठिकाणी जाण्यास पोहच रस्ता नसतानाही त्या ठिकाणी इमारती उभारणीची कामे सुरू पाहून पोलीस हैराण झाले. या जागेवर पोकलेन, जेसीबी येण्यास जागा नसल्याने पाचहून अधिक ब्रेकरच्या साहाय्याने छताचे स्लॅब तोडण्याची कामे सुरू करण्यात आली. इमारतींच्या भिंती घणांनी तोडण्यात आल्या. नवीन बांधकामांचे खांब तोडून टाकण्यात आले. इमारतींवर कारवाई केल्यानंतर त्यात अडथळा आणला तर भूमाफियांवर फौजदारी कारवाई करण्याचा इशारा सहाय्यक आयुक्त गुप्ते यांनी दिला होता. त्यामुळे माफिया कारवाई सुरू झाल्यानंतर पुढे आले नाहीत. या भागातील दोन बेकायदा इमारतींमध्ये काही रहिवासी राहण्यास आले आहेत. १० इमारती अधिकाधिक तोडकाम करुन या भागात रस्ता केल्यानंतर जेसीबी, पोकलेनच्या साहाय्याने या इमारती जमीनदोस्त केल्या जातील, असे गुप्ते यांनी सांगितले.