दिवा-कळवा येथे अनधिकृत बांधकामांवर ठामपाचा हातोडा

ठाणे : वाढत्या तक्रारींनंतर ठाणे महापालिकेने सर्वाधिक अनधिकृत बांधकामे सुरू असलेल्या कळवा आणि दिवा प्रभागात निष्कासन कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे.

ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या आदेशाने अतिक्रमण उपायुक्त गोदापुरे आणि अतिक्रमण विभागाचे समन्वयक महेश आहेर यांच्या उपस्थितीत ही कारवाई सुरू करण्यात आली आहे.

महापालिकेच्या सर्व नऊ प्रभाग समित्यांमध्ये सर्व समित्यांचे सहाय्यक आयुक्त यांच्यासोबत ही कारवाई करण्यात येणार असून अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांवर एमआरटीपीचे गुन्हे देखील दाखल करण्यात येणार असल्याचे महेश आहेर यांनी यावेळी सांगितले.

कळवा-विटाव्यात ‘बेदरकारी’चे मजले

या कारवाईचे दक्ष नागरिक आणि जागरूक संस्थांनी स्वागत केले आहे. विटाव्यातील भविष्यातील पर्यावरणाचा धोका ओळखून येथे सुरू असलेल्या अनधिकृत इमारतींवर कारवाई करण्याची मागणी चहुबाजूंनी होत असताना साईबाबा मंदिरामागे सुरू असलेली इमारत आणि इतर काही इमारतींकडे कळवा प्रभाग समितीच्या सहायक आयुक्तांनी ढुंकूनही पाहिलेले नाही. कळव्यातील कुंभार आळी येथे सुरू असलेल्या इमारतीला पाठीशी घातले जात असल्याचेही स्पष्ट झाले आहे. अतिक्रमण विभागाचे समन्वयक महेश आहेर यांनी या ‘बेदरकार’ मजल्यांना भुईसपाट करावे अशी मागणी होत आहे.