पालिका आयुक्तांचे प्रशासनाला आदेश
ठाणे: ठाण्यातील अनधिकृत बांधकामांबाबत आमदार संजय केळकर यांनी विधानसभेत लक्षवेधी मांडल्यानंतर प्रशासन पुन्हा एकदा खडबडून जागे झाले आहे. प्रत्येक आठवड्याला एका मोठ्या इमारतीवर हातोडा टाकण्याचे आदेश ठाणे महापालिकेचे आयुक्त अभिजित बांगर यांनी अधिकाऱ्यांना दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.
ठाणे शहरात झालेल्या आणि होत असलेल्या अनधिकृत बांधकामांचा मुद्दा नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात चांगलाच गाजला. शहरात कळवा, मुंब्रा, दिवा, कोपरी, माजिवडे, मानपाडा, येऊर आदी भागात अनधिकृत इमारतींची बांधकामे झाली असून काही सुरू देखील आहेत. याबाबत ठामपा आयुक्तांना भेटून छायाचित्रानिशी पुरावे सादर केले आहेत. ते कारवाईचे आदेश देतातही, पण खालचे निर्ढावलेले अधिकारी या बांधकामांना फक्त नोटीसा बजावतात आणि त्यांना पाठीशी घालतात. अनधिकृत बांधकामे कोसळून शेकडो नागरीकांचे नाहक बळी जाऊनही महापालिकेला जाग येत नसल्याची टीका आ.केळकर यांनी विधानसभेत केली होती.
विधानसभेत हा मुद्दा उपस्थित झाल्यानंतर आता ठाणे महापालिका प्रशासन देखील ॲक्शन मोडवर आले असून अनधिकृत बांधकामांच्या विरोधात लवकरच पुन्हा एकदा कारवाईला सुरुवात होण्याची चिन्हे आहेत. यासंदर्भात पालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी अधिकाऱ्यांना आठवड्याला एका मोठ्या अनधिकृत इमारतीवर हातोडा चालवण्याचे फर्मान सोडले आहे. या निर्णयाची तत्काळ अमलबजावणी करण्याचे आदेशही आयुक्तांनी दिले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र आमदार केळकर यांनी केलेल्या आरोपांप्रमाणे आयुक्तांनी आदेश देऊनही खालचे अधिकारी आयुक्तांच्या आदेशांची अंमलबजावणी करणार का? असा प्रश्न आता यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.
आरक्षित भूखंडावर बांधकाम झाल्यास अधिकारी जबाबदार
अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यासोबतच आरक्षित जागेवर किंवा शासनाच्या भूखंडावर अनधिकृत बांधकाम झाल्यास या बांधकामांसाठी संबंधित पालिका अधिकाऱ्याला जबाबदार धरण्यात येणार असल्याचेही निर्देश आयुक्तांनी दिले आहेत. आयुक्तांच्या या निर्णयामुळे आता अधिकारी देखील कामाला लागले असून एखाद्या आरक्षित भूखंडावर बांधकाम केले जात नाही ना यासंदर्भात माहिती घेण्याचे काम देखील सुरु करण्यात आले आहे.
खाडीच्या पलिकडे बांधकामे जोरात
संपूर्ण ठाणे शहरातच अनधिकृत बांधकामे होत असली तरी विशेष करून खाडीच्या पलीकडे, कळवा, मुंब्रा आणि मोठ्या प्रमाणात दिवा परिसरात छोटी आणि मोठी अशी शेकडो अनधिकृत बांधकामे सुरु आहेत. काही बांधकामे खुलेआम होत असून काही बांधकामे लपून होत असल्याचे उघड झाले आहे. एकट्या कळवा आणि खारीगांव परिसरात ५० पेक्षा अधिक बांधकामे सुरु असून प्रशासनाच्या डोळ्यादेखत ही बांधकामे पूर्ण केली जात आहेत.