सफाई कामगारांना दालन तर कागदपत्रांना जमिनीचा आधार

मीरा-भाईंदर प्रभाग कार्यालयाचा मनमानी कारभार

भाईंदर : शहरातील नागरिकांच्या कर रुपी पैशातून सफाई कामगारांसह प्रभाग अधिकाऱ्यांना काम करण्यासाठी वातानुकूलित दालनांची सुविधा उपलब्ध होत असताना नागरिकांच्या मालमत्ता कराच्या दस्ताऐवज फाईंलींना व्हरांड्यांसह जमिनीवर पसरुन ठेवल्याचे प्रभाग कार्यालय क्र. १ मध्ये दिसून येत आहे.

शासनाकडून प्रतिनियुक्तीवर आलेल्या सहायक आयुक्त सार्वजनिक आरोग्यासह प्रभाग १ चा कार्यभार सोपविण्यात आला असून मुख्यालयातच बहुतेक कालावधीसाठी उपलब्ध असलेल्या बच्छावांचे प्रभाग कार्यालयाकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे.

प्रभाग क्र. १ च्या हद्दीतील उत्तन, राई, मोर्वा, मुर्धा, डोंगरी, पाली परिसरासह अनेक ठिकाणी अनधिकृत बांधकामे जोमात सुरू असून सदर बांधकामाविरोधात कारवाई होत नसल्याचे दिसून येत असून अनधिकृत बांधकामांना मालमत्ता कर आकारणी करण्यात येत आहे. प्रभाग कार्यालयातील दहा- दहा वर्षे ठाण मांडून बसलेल्या कर्मचाऱ्यांच्या इशाऱ्यानुसार मालमत्ता कर आकारणीसह नळ जोडणी व इतर कामकाज सुरू असून सदर कामकाजाचे दस्तऐवज दिवसांगणिक वाढतच आहेत. महापालिकेतील दस्ताऐवज स्कॅनिंग करण्यासाठी पालिकेने लाखो रुपयांचा ठेका दिला आहे. नागरिकांच्या लाखो करोडोंच्या मालमत्ता दस्तऐवजांची नियमानुसार जपणूक करण्याऐवजी त्यांना व्हरांड्यांसह जमिनीवर धूळ खात ठेवले असून पावसाच्या पाण्याच्या माऱ्याने सदर दस्तऐवज खराब होण्याचीही शक्यता आहे.

प्रभाग कार्यालयातील कर्मचाऱ्यांसह प्रभाग अधिकाऱ्यांस वातानुकुलित दालनांची व्यवस्था होत असताना नागरिकांच्या मालमत्ता दस्तऐवजांना जमिनीवर फेकून दिल्याने पालिका कारभाराची झलक नागरिकांना पहावयास मिळत आहे.