महायुतीला ५० टक्के तर मविआला ३१ टक्के मतदान
ठाणे: नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील ५० टक्के मतदारांनी महायुतीला पसंती दर्शविली आहे तर दुसरीकडे महाविकास आघाडीच्या पारड्यात ३१ टक्के मतदान झाले आहे.
जिल्ह्यातील १८ जागांसाठी महायुतीतील भाजपने नऊ जागा लढवून त्या सर्व जिंकल्या आहेत. शिवाय मतांच्या गोळाबेरजेतही २५ टक्क्यांहून अधिक वाटा असल्याने महायुतीत भाजपाचा वरचष्मा असल्याचे दिसून येते.
शिवसेना शिंदे गटानेही सातपैकी सहा जागा जिंकल्या असून २२ टक्क्याहून अधिक मते मिळवली आहेत. दुसरीकडे दहा जागा लढवणार्या शिवसेना ठाकरे गटाकडे १४ टक्के मते तर शरद पवार गटाने सहा जागा लढवून १२ टक्के मते आपल्या पारड्यात खेचली आहेत.
विधानसभा निवडणुकीत राज्यात निर्विवाद बहुमत प्राप्त करताना महायुतीने ठाणे जिल्ह्यात १८ पैकी १६ जागा जिंकल्या आहेत. महाविकास आघाडीला मात्र दोन जागा राखण्यात यश मिळाले आहे. मतांच्या गणितात महाविकास आघाडी पिछाडीवर असली तरी महायुतीच्या उमेदवारांना अनेक ठिकाणी चांगली झुंज दिली आहे. या झुंजीत जिल्ह्यातील महायुतीच्या १३ आणि महाविकास आघाडीच्या दोन विद्यमान आमदारांनी पुन्हा दणदणीत विजय मिळवला. तर दोन नवीन चेहर्यांसह एका माजी आमदाराचे पुनरागमन झाले आहे. त्यामुळे भाजप आणि शिवसेना शिंदे गटाच्या खात्यामध्ये प्रत्येकी एका आमदाराची वाढ झाली आहे.
ठाणे जिल्ह्यात ७२ लाख २९,३३९ मतदारांपैकी ४१ लाख १५,७५७ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. यामध्ये पुरुष २१ लाख ८३,५११ मतदार, १९ लाख ३१,९७३ महिला तर २७३ इतर मतदारांचा समावेश आहे. २०१९ मध्ये जिल्ह्यात ४९ टक्के मतदान झाले होते. तर २०१४ मध्ये त्यात तब्बल नऊ टक्क्यांची वाढ होऊन एकूण मतदान ५६.९३ टक्के झाले. यावेळी भाजप, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पवार गट आणि रिपाइं महायुती तर शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि काँग्रेस, सपा ही महाविकास आघाडी अशी लढत झाली. याशिवाय मनसेनेही पाच ठिकाणी आपले उमेदवार उभे केले होते. छोटे- मोठे राजकीय पक्षांसह अपक्षांची शंभरहून अधिक फौज मैदानात होती. पण लाडकी बहिण योजनेमुळे महिलांनी महायुतीच्या पारड्यात सढळ हस्ते मतदान केल्याचे दिसते. पण एकूण मतांवर नजर टाकली असता शिवसेनेचा बालेकिल्ला असलेला ठाणे जिल्हा आता भाजपचा गड बनला असल्याचे दिसते.
एकूण झालेल्या ४१ लाख १५,७५७ मतदानापैकी भाजपला सर्वाधिक १० लाख ३४,१०५ मते मिळाली आहेत. भाजपने १८ पैकी नऊ जागा लढवल्या होत्या. त्या सर्व जागा जिंकल्या आहेत. विशेष म्हणजे २०१९ साली मीरा-भाईंदरची गमावलेली जागाही खेचून आणली आहे. त्यामुळे भाजपच्या आमदारांची संख्या आठवरून नऊ झाली आहे.
दुसर्या क्रमांकावर शिवसेना शिंदे गट आहे. जिल्ह्यात सात जागा लढवून शिवसेना शिंदे गटाचे सहा शिलेदार निवडून आले आहेत. यामध्ये २०१९ साली गमावलेल्या कल्याण ग्रामीणमध्ये दणदणीत विजय मिळवला आहे. त्यामुळे शिवसेना शिंदे गटाच्या जागा पाचवरून सहा झाल्या आहेत. एकूण मतदानामध्ये शिवसेना शिंदे गटाला नऊ लाख १६,६६७ मते मिळाली आहेत.
शिवसेना ठाकरे गटाला तिसर्या क्रमांकाची मते मिळाली आहेत. जिल्ह्यात ठाकरेंनी दहा विधानसभांवर आपले उमेदवार उभे केले होते. त्यांनी एकूण पाच लाख ८३,४२५ मते मिळवली आहेत. ठाकरेंना जिल्ह्यात एकही जागा जिंकण्यात यश आले नाही.
राष्ट्रवादी शरद पवार गटाने जिल्ह्यात पाच जागा लढवल्या. त्यापैकी कळवा-मुंब्रा ही हक्काची जागा जिंकण्यात यश आले. पण शहापूर, बेलापूरमध्ये अत्यंत कमी फरकाने राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार पराजित झाले. जिल्ह्यात राष्ट्रवादी शरद पवार गटाला १२ टक्के म्हणजे चार लाख ९४,६१९ मते मिळाली.
चौकट
महायुती- ५०.६५ टक्के
भाजप- २५.१२ टक्के
शिवसेना शिंदे गट- २२.२७ टक्के
राष्ट्रवादी अजित पवार गट- ३.२५ टक्के
चौकट
महाविकास आघाडी- ३१.६७ टक्के
शिवसेना ठाकरे गट- १४.१७ टक्के
राष्ट्रवादी शरद पवार गट- १२ टक्के
काँग्रेस व सपा- ५ टक्के