ठाणे : मागील तीन वर्षाचे पासूनची सानुग्रह अनुदान, गणवेश, तीन महिन्यांपासूनचे थकीत वेतन आदी मागण्यांसाठी बुधवारी सी. पी. तलाव येथील कचरा ट्रान्सफर स्टेशन येथे कंत्राटी पद्धतीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी अर्धनग्न आंदोलन केले.
पालकमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यासाठी ते गेले असता, ते मंत्रालयात असल्याने त्यांनी ठामपा मुख्याल्यावर आंदोलन केले. यावेळी संबंधित ठेकेदारावर तत्काळ कारवाई करण्याची मागणी कर्मचाऱ्यांनी केली.
ठाणे महापालिका क्षेत्रात दररोज निर्माण होणाऱ्या कचऱा सी पी तलाव येथे नेला जातो आणि त्यानंतर कचऱ्याचे वर्गीकरण करून तो कचराभुमीवर नेला जातो. या कचरा वाहतूकीच्या कामासाठी पालिकेने मे. मेट्रो वेस्ट हॅण्डलिंग प्रा. लि. या कंपनीची नेमणूक केली असून २०१७ पासून ही कंपनी हे काम करीत आहे. हे काम १० वर्षाकरिता या कंपनीला देण्यात आले आहे. या ठेकेदारामार्फत सी.पी. तलाव येथे सुमारे ६१ कामगार काम करीत असून त्यात वाहन चालक, वाहन चालक सहाय्यक, सफाई कामगार आणि मेंटेनन्स कामगार यांचा समावेश आहे.
या ठेकेदारावर प्रशासनाच्या संबंधीत विभागाचा अंकुश नसल्यामुळे त्याने गेल्यावर्षी दिवाळीत कामगारांना बोनस दिला नाही. एवढेच नव्हे तर मार्च महिना संपत आला तरीही कामगारांना जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्याचे वेतन दिलेले नाही. ठेकेदाराच्या या आडमुठ्या धोरणामुळे या कामगारांवर व त्यांच्या कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आली आहे, अशी माहिती म्युनिसिपल लेबर युनीयनचे सरचिटणीस बिरपाल भाल आणि चिटणीस चेतन आंबोणकर यांनी दिली.