ठाणे कारागृहातील तोफांना मिळाली नवसंजीवनी

सह्याद्री प्रतिष्ठानचा उपक्रम

ठाणे : येथील मध्यवर्ती कारागृहात सह्याद्री प्रतिष्ठान ठाणे जिल्हा मार्फत “ठाणे मुक्ती दिन” उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने प्रतिष्ठान मार्फत येथे जमिनीवर पडलेल्या ऐतिहासिक तोफांना तोफगाडे बसविण्यात आले.

या कार्यक्रमाला सह्याद्री प्रतिष्ठानचे महाराष्ट्र राज्याचे कार्याध्यक्ष व ठाण्याचे आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, ज्येष्ठ इतिहासकार पांडुरंग बलकवडे, सह्याद्री प्रतिष्ठानचे संस्थापक श्रमिक गोजमगुंडे, रायगड मंडळाचे सचिव श्री. थोरात, कारागृहाचे अधिक्षक श्री. अहिरराव शेकडो दुर्गसेवक व ठाणेकर नागरिक उपस्थित होते.

सह्याद्री प्रतिष्ठान ठाणे जिल्हा मार्फत गेल्या आठ वर्षापासून ठाण्यात ठाणे मुक्ती दिन मोठ्या उत्साहत साजरा होत असतो. गेल्या वर्षी झालेल्या कार्यक्रमात कारागृहातील तोफांना सह्याद्री प्रतिष्ठानच्या माध्यमातून तोफगाडे बसविण्यात येतील असे सांगितले होते. त्याप्रमाणे लोकवर्गणीतून हे तोफगाडे बसविण्यात आल्याची माहिती प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष आ. केळकर यांनी दिली.

श्रमिक गोजमगुंडे यांनी सह्याद्री प्रतिष्ठानच्या पुढील होणाऱ्या कामाची माहिती देऊन, लवकरच महाड येथील मुरारबाजी देशपांडे यांच्या समाधीच्या  जिर्णोद्धाराचे काम पूर्ण होणार असल्याचीही माहिती दिली.

ज्येष्ठ इतिहासकार पांडुरंग बलकवडे यांनी ठाणे किल्ला म्हणजे आताचे मध्यवर्ती कारागृह याचा लढाईचा इतिहास आपल्या भाषणातून ठाणेकरांसमोर उभा केला. 27 मार्च 1737 साली चिमाजी अप्पा यांनी स्थानिकांच्या सहकार्याने किल्ल्यावर हल्ला चढविला आणि एका दिवसात पोर्तुगीजांच्या जोखडातून ठाणे किल्ला सोडविला. या झालेल्या लढाईत बलकवडे, ढमढरे अशा अनेक सरदारांनी शौर्य दाखवले अशी माहिती श्री. बलकवडे यांनी दिली.

27 मार्च 1737 रोजी ठाणे किल्ला पोर्तुगीजांच्या जोखडीतून मुक्त केला यामुळेच या दिवसाचे महत्व ओळखून सह्याद्री प्रतिष्ठान ठाणे जिल्हा मार्फत ज्येष्ठ  इतिहासकारांच्या व ठाणेकरांच्या उपस्थितीत ठाणे मुक्ती दिन साजरा केला जातो असे ठाणे जिल्हा अध्यक्ष महेश विनेरकर यांनी सांगितले.