सावित्रीच्या लेकींचा चिखलातून प्रवास
शहापूर: तालुक्यातील गुंडे गावाजवळील भोईरपाडा ग्रामस्थांना तब्बल 50 वर्षांपासून जाण्या-येण्यासाठी जोडरस्ताच नसल्याने लहान मुलांसह महिला व विद्यार्थ्यांना तारेवरची कसरत करून इच्छितस्थळ गाठावे लागते.
गुंडे-डेहणे ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या भोईरपाडा येथे 123 लोकसंख्या वास्तव्य करीत आहे. येथील ग्रामस्थ मागील अनेक वर्षांपासून जोडरस्त्याची मागणी करीत असून स्थानिक आमदार दौलत दरोडा यांच्याकडे सुद्धा रस्त्याबाबत निवेदन दिले असल्याचे स्थानिक रहिवाशी अनंता भोईर यांनी सांगितले. मात्र आजपर्यंत या रस्त्याबाबत ना प्रशासनाने लक्ष दिले, ना लोकप्रतीधींकडून समस्या सोडवली गेली. त्यामुळे ग्रामस्थांची रस्त्याअभावी फार हेळसांड होत आहे.विद्यार्थ्यांना पावसाळ्यात चिखल तुडवत शाळेची वाट धरावी लागते. तर रुग्णांना उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यास दिरंगाई झाल्यास रुग्ण दगावण्याची शक्यता ग्रामस्थांनी व्यक्त केली. भोईर पाडा येथे आम्ही 50 ते 60 वर्षांपासून वास्तव्य करत असून मागील अनेक वर्षांपासून आम्ही करत असलेली जोडरस्त्याची मागणी तत्काळ पूर्ण करावी, असे दिनेश भोईर, महादेव भोईर, प्रकाश जाधव, सुनिल हिलम, शरद भोईर, निलेश बडेराव, अक्षय भोईर व किरण हिलम यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
मागील 60 वर्षांपासून आम्ही भोईर पाड्यात राहतो. गुंडे ते भोईर पाडा हे 300 मीटर अंतर होईल. मागील अनेक वर्षांपासून हा जोड रस्ता व्हावा म्हणून मागणी करतो. पण निवडणुका आल्या की आम्हाला आश्वासन दिले जाते. हा जोडरस्ता पावसाळ्यात चिखलमय व उन्हाळ्यात धुळीने भरलेला असतो. त्यामुळे शालेय विद्यार्थी,चाकरमानी तसेच महिला व जेष्ठ नागरिकांना कसरत करून प्रवास करावा लागतो, असे अनंता भोईर यांनी सांगितले.