नववर्ष स्वागत यात्रा यंदा उत्साहात पार पडणार; ७० हून अधिक संस्थांचा सहभाग

ठाणे : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मराठी नववर्षानिमित्त जिल्ह्यातील विविध शहरांमध्ये निघणारी स्वागत यात्रा मागील दोन वर्षे रद्द करण्यात आली होती. यंदा मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होऊन सांस्कृतिक कार्यक्रमांवरील निर्बंध शिथिल झाल्यामुळे नागरिकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. त्यामुळेच गुढीपाडव्यानिमित्त स्वागतयात्रा काढण्याची उत्साहपूर्ण तयारी आयोजकांकडून सुरू आहे.

ठाणे शहरात श्री कोपिनेश्वर सांस्कृतिक न्यास यांच्यातर्फे मागील २० वर्षांपासून गुढीपाडव्यानिमित्त जवळपास दीड ते दोन किलोमीटर अंतराची मुख्य नववर्ष स्वागतयात्रा काढली जाते. यासोबत जिल्ह्यातील ७ ते ८ शहरांमधील संस्थादेखील आपल्या शहरात उपयात्रा काढत असतात. ठाण्यातील मुख्य यात्रेत दरवर्षी ७० हून अधिक संस्था सहभागी होतात. त्यात ४० ते ५० चित्ररथांचा सहभाग असतो. मराठी नववर्षानिमित्त निघणारी ही स्वागतयात्रा कोपिनेश्वर मंदिरापासून जांभळी नाका, समर्थ मंदिर, तीन पेट्रोल पंप, हरिनिवास यामार्गाने जात पुन्हा तलावपाळी येथे संपन्न होत असते.

स्वागतयात्रेची तयारी २ ते ३ महिने आधीपासून सुरू होत असून, यात मराठमोळ्या संस्कृतीतील विविध छटांचे दर्शन नागरिकांना होत असते. कोरोना साथीमुळे गेली दोन वर्ष या स्वागतयात्रेला ब्रेक लागला होता. मागील वर्षी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे भव्य रक्तदान शिबिर आयोजित करून गुढीपाडव्याचा सण साजरा करण्यात आला होता. यंदा मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होऊन निर्बंध शिथिल झाल्यामुळे कोपिनेश्वर मंदिर ज्ञानकेंद्र येथे ७ मार्चला स्वागतयात्रा आयोजनासंबंधित पहिली बैठक पार पडली. त्यानंतर स्वागतयात्रेच्या तयारीला सुरुवात करण्यात आली आहे. गुढीपाडव्याचा सण अवघ्या काहीच दिवसांवर येऊन ठेपल्याने स्वागतयात्रेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या संस्थांना लवकरात लवकर नोंदणी करण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

दर सोमवारी बैठक

पुढील महिन्यात २ एप्रिलला गुढीपाडवा आहे. त्यानिमित्त स्वागत यात्रा काढण्याचे नियोजन आहे. याच पार्श्वभूमीवर विचारविनिमय करण्यासाठी कोपिनेश्वर मंदिर ज्ञानकेंद्र येथे दर सोमवारी आठ वाजता कोपिनेश्वर सांस्कृतिक न्यास यांच्यातर्फे सभा होणार आहे. स्वागतयात्रेत सहभागी होण्यासाठी इच्छुक असणाऱ्या संस्था-प्रतिनिधींना सभेला हजर राहण्याची विनंती करण्यात आली आहे. स्वागतयात्रेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या संस्थांनी संपर्क साधून नोंदणी करण्याचे आवाहन केले आहे.

कोरोनाचे निर्बंध शिथिल झाल्यामुळे यंदा नववर्ष स्वागतयात्रेचे आयोजन करण्याकरीता आम्ही सर्व उत्साही आहोत. यंदा आयोजनासाठी फार कमी वेळ मिळाला असला तरी त्यातूनही मोठ्या कालावधीनंतर होणारी यंदाची स्वागतयात्रा पूर्वीपेक्षा अधिक भव्य आणि उत्साहपूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. स्वागतयात्रेची पूर्वतयारी आणि नियोजन कसे असावे, याबाबत आम्ही सभा घेत आहोत.

– अत्तम जोशी, अध्यक्ष, श्री कोपिनेश्वर सांस्कृतिक न्यास, ठाणे.