आशियाई फुटबॉल चषकासाठी महाराष्ट्रातील मैदाने सज्ज

मुंबई : पुढील वर्षी भारतात होणाऱ्या महिलांच्या आशियाई चषक फुटबॉल स्पर्धेसाठी वापरण्यात येणाऱ्या तीन मैदानांची आशियाई फुटबॉल महासंघाच्या (एएफसी) शिष्टमंडळाकडून गुरुवारी पाहणी करण्यात आली.

एएफसीच्या शिष्टमंडळाने १६ ते २१ सप्टेंबर या कालावधीत नवी मुंबईचे डी. वाय. पाटील स्टेडियम, अंधेरी क्रीडा संकुल येथील मुंबई फुटबॉल एरिना आणि बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलाच्या मैदानांची, तसेच सरावासाठीच्या सुविधांची पाहणी केली. या तिन्ही मैदानांच्या स्थितीबाबत शिष्टमंडळाने समाधान व्यक्त केले आहे. पुढील वर्षी २० जानेवारी ते ६ फेब्रुवारी या कालावधीत भारतात होणाऱ्या या स्पर्धेत तब्बल दोन दशकांनंतर १२ संघ सहभागी होणार आहेत. महिलांच्या २०२३ फिफा विश्वचषकाच्या पात्रतेसाठी ही आशियातील अखेरची स्पर्धा असेल.