हिरव्या वाटाण्याची वट वाढली

आवक घटल्याने दरात १० रुपयांनी वाढ

नवी मुंबई: एपीएमसीमध्ये मंगळवारी हिरव्या वाटाण्याची आवक घटल्याने दरात प्रतिकिलो १० रुपयांनी वाढ झाली आहे. घाऊक बाजारात आधी प्रतिकिलो ६०-६५ रुपयांनी उपलब्ध असलेला वाटाणा आता ७०-७५ रुपयांनी विक्री होत आहे.

एपीएमसी बाजारात डिसेंबर महिन्यात मोठ्या प्रमाणात हिरवा वाटाणा दाखल होण्यास सुरुवात होत असते. शिवाय डिसेंबरमध्ये वाटाण्याचा खरा हंगाम सुरू होतो तर वर्षभर तुरळक वाटाणा दाखल होत असतो. बाजार समितीत मध्य प्रदेशातून हिरवा वाटाण्याची आवक होते. मात्र सध्या एपीएमसीत राज्यातील सातारा, नाशिक येथील वाटाणा दाखल होत आहे. मागील एक महिन्यापासून घाऊक बाजारात वाटाणा ४० रुपयांपर्यंत उतरला होता. मात्र बाजारात आता पुन्हा हिरव्या वाटाण्याची आवक २०टक्के ते २५टक्के घटली आहे, त्यामुळे दरात १० रुपयांनी वाढ झाली आहे. आधी ६०-६५ रुपये प्रतिकिलो दराने विक्री होणारा वाटाणा आता ७०-७५ रुपयांनी विकला जात आहे. किरकोळ बाजारात वाटाणा ११० ते १२५ रुपयांनी विकला जात आहे तर पुढील कालावधीत आवक आणखी कमी होणार असून दरात वाढ होणार आहे, अशी माहिती व्यापारी संतोष तांजने यांनी दिली आहे.