हिरवा वाटाणा गडगडला

नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या काही दिवसांपासून भाज्यांच्या दरात घसरण होत आहे. सध्या बाजारात हिरव्या वाटाण्याचा हंगाम सुरू झाल्याने आवक वाढली आहे. त्यामुळे दरात घसरण झाली असून वाटाणा प्रतिकिलो १६ रुपयांनी विकला जात आहे. हिरवा वाटाणा स्वस्त झाल्याने इतर भाज्या देखील स्वस्त झाल्या आहेत, असे मत व्यापारी व्यक्त करीत आहेत.

एपीएमसी बाजारात साधारणतः नोव्हेंबर महिन्यापर्यंत हिरवा वाटाण्याची आवक खूप तुरळक प्रमाणात होते असते. या वाटाण्याच्या मंदीच्या हंगामात आवक कमी असल्याने त्याचे भाव गगनाला भिडत असतात. यावेळी हिरव्या वाटाण्याच्या दराने उच्चांक गाठला होता. घाऊक  बाजारात २०० रुपये तर किरकोळ बाजारात २५० ते ३०० रुपये किलो दराने विक्री होत होता. मात्र डिसेंबरपासून वाटाण्याची आवक वाढली असून वाटाण्याचा हंगाम सुरू झालेला आहे. त्यामुळे बाजारात मोठ्या प्रमाणावर आवक होत आहे.

शुक्रवारी बाजारात हिरव्या वाटाण्याच्या एकूण ५७ गाड्या दाखल झाल्या होत्या. यामधून ४८०० क्विंटल वाटाणा आवक झाली आहे, त्यामुळे आधी प्रति किलो २४ ते ३० रुपयांनी उपलब्ध असलेल्या वाटाणा आता १६ रुपयांवर विक्री होत आहे. घाऊक बाजारात वाटाणा स्वस्तात उपलब्ध होत असल्याने किरकोळ बाजारातही ३०-४० रुपये किलोने विक्री होत आहे.

कोबी १ रूपयावर

बाजारात कोबीची आवक देखील मोठ्या प्रमाणात वाढल्याने  कोबीचे भाव घसरले आहेत. घाऊक बाजारात मागील आठवड्यात प्रति किलो ४ ते सहा रुपयांना उपलब्ध असलेला कोबी आता एक रुपयावर आला आहे. तर कोबीची ६० किलोची गोणी १०० ते १५० रुपयांना बाजारात विक्री होत आहे. बाजारात कोबीच्या २२ गाड्या दाखल झाल्या असून यामधून १९७१ क्विंटल कोबीची आवक झाली आहे.