कल्याणच्या डंपिंग ग्राऊंडला भीषण आग; पसरले धुराचे लोट 

कल्याण : कल्याण पश्चिमेकडील  आधारवाडी डम्पिंग ग्राऊंडला आज सायंकाळच्या सुमारास अचानक  भीषण आग लागल्याची घटना  घडली आहे. या आगीमुळे धुराचे  मोठे लोट नागरी वस्तीत पसरल्याने  धुराचा त्रास नागरिकांना होताना  दिसत असून आगीबाबत माहिती  मिळताच कल्याण-डोंबिवली  महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या  चार गाड्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आगीवर पाण्याचा फवारा  सुरू केला होता. कल्याण पश्चिम  परिसरात असलेल्या खाडी किनारी    सायंकाळच्या सुमारास सुटलेला   वारा आणि कचऱ्यापासून तयार झालेल्या मिथेन वायूमुळे ही आग लागल्याची  शक्यता आहे.

महापालिका क्षेत्रात दररोज ६०० ते  ६६० मेट्रीक टन कचरा गोळा होतो.  आधारवाडी डम्पिंग ग्राऊंडवर हा  कचरा टाकण्यात येतो. मात्र डम्पिंग  ग्राऊंडची क्षमता संपुष्टात आल्याने हा  कचरा डेपो बंद करण्याचे आदेश  मुंबई हायकोर्टाने पालिकेला दिले  आहेत. त्यानुसार महापालिकेने  उंबर्डे येथे ३५० मेट्रीक टन व बारावे  येथे २०० मेट्रीक टनाचा घनकचरा  शास्त्रोक्त पध्दतीने प्रक्रिया करण्याचा  प्रकल्प तयार केला आहे. आधारवाडी डम्पिंग ग्राऊंडचा उग्र  वास आणि सातत्याने लागलेल्या  आगीमुळे होणार्‍या धुराने परिसरातील नागरिक हैराण झाले आहेत.

तीन वर्षात आधारवाडी डम्पिंग  ग्राऊंडला अनेकवेळा आगी  लागण्याचे प्रकार घडले आहेत.  गेल्यावर्षी दोन ते तीन वेळा भीषण  आग लागली होती. २०१६ मध्येही सहावेळा आग लागल्याचा प्रकार घडला होता. यावेळी लागलेल्या भीषण आगीत कचरा डेपोशेजारी असलेल्या साठेनगर वसाहतीतील रहिवाशांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले होते.

गेल्या अनेक वर्षांपासून डम्पिंग  ग्राऊंडला आग लागली जात  असताना त्याचा शोध मात्र  प्रशासन अजूनही लावू शकलेली  नाही. डम्पिंग ग्राऊंडवर शून्य कचरा  मेाहिमेतंर्गत जैव शेतीचा पायलट  प्रोजेक्ट राबविला जात आहे.