प्रेसिडेंट कप इंडिया 2026 टेनिस क्रिकेट स्पर्धेचा भव्य शुभारंभ

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अभिनेते सलमान खान यांची मुख्य उपस्थिती

ठाणे: टेनिस क्रिकेट स्पोर्ट फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या प्रेसिडेंट कप इंडिया 2026 या देशव्यापी टेनिस क्रिकेट स्पर्धेचा भव्य शुभारंभ आज मंगळवारी ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडियम येथे झाला. या स्पर्धेचे उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि बॉलिवूडचे सुप्रसिद्ध अभिनेते सलमान खान यांच्या हस्ते करण्यात आले.

कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकारातून या भव्य स्पर्धेचे आयोजन करण्यात येत असून, ते टेनिस क्रिकेट स्पोर्ट फेडरेशन ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणूनही कार्यरत आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली टेनिस क्रिकेटला राष्ट्रीय स्तरावर संघटित व व्यावसायिक ओळख मिळवून देण्याचा महत्त्वपूर्ण प्रयत्न या स्पर्धेच्या माध्यमातून होत आहे.

आयटीसीएसएफच्या माध्यमातून देशभरातील टेनिस क्रिकेट खेळाडूंना मोठे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने या स्पर्धेची सुरुवात करण्यात येत आहे. येत्या ३१ मार्च ते ५ एप्रिल या कालावधीत देशातील विविध राज्यांतील १६ संघांमध्ये ही स्पर्धा रंगणार असून, मोठ्या संख्येने खेळाडूंना आपली गुणवत्ता सिद्ध करण्याची संधी मिळणार आहे. स्पर्धेची बक्षीस रक्कम ४० लाखांवरून थेट एक कोटी रुपयांपर्यंत वाढवण्याचा ऐतिहासिक निर्णय आयटीसीएसएफने घेतला आहे.

या स्पर्धेत महाराष्ट्र वॉरियर्स, पुणे पायराइट्स, बिहार ब्लास्टर्स, दिल्ली स्ट्राइकर्स, ड्रीम हरियाणा रॉयल्स, गुजरात लायन्स, कर्नाटक रॉयल किंग्स, केरळ वॉरियर्स, कोलकाता रायडर्स (वेस्ट बंगाल), मध्य प्रदेश टायगर्स, पूर्वांचल पँथर्स, राजस्थानी योद्धाज, रॉयल चॅलेंजर्स गोवा, सुप्रीम सुपर किंग्स (तमिळनाडू), यूपी नाइट्स आणि उत्तराखंड टायगर्स असे एकूण १६ संघ सहभागी होणार आहेत. विजेत्या संघाला एक कोटी रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार असून, स्पर्धेत कोट्यवधी रुपयांची बक्षिसे वितरित केली जाणार आहेत.

टेनिस क्रिकेट हा सर्वसामान्य तरुणांचा खेळ असून, ग्रामीण व शहरी भागातील अनेक प्रतिभावान खेळाडूंना राष्ट्रीय स्तरावर चमकण्याची ही सुवर्णसंधी ठरणार आहे. या उद्घाटन सोहळ्याला परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या सह क्रीडा क्षेत्रातील मान्यवर, विविध संघांचे खेळाडू तसेच मोठ्या संख्येने क्रिकेटप्रेमी उपस्थित होते.

स्पर्धेत प्रेक्षक आणि खेळाडूंसाठी आकर्षक बक्षिसांचीही मेजवानी ठेवण्यात आली आहे. दररोज भाग्यवान प्रेक्षकांना दुचाकी तसेच हजारो रुपयांची रोख बक्षिसे दिली जाणार आहेत. याशिवाय स्पर्धेतील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना विशेष सन्मान देण्यात येणार असून प्लेअर ऑफ द सिरीज विजेत्याला महिंद्रा थार ही कार प्रदान करण्यात येणार आहे, तर बेस्ट प्लेअरला दुचाकी दिली जाणार आहे. तसेच स्पर्धेदरम्यान विविध विशेष पारितोषिके आणि सरप्राईज गिफ्ट्सही दिली जाणार आहेत.