ठाणे: एखादी संस्था सुरू करणं खूप सोपं असतं कारण, एखादे काम सुरू करण्यासाठी आपण सगळेच नेहमी उत्सुक असतो. पण ती संस्था सातत्याने वर्षानुवर्षे चालवणं, ती प्रगतीपथावर ठेवणं यासाठी प्रचंड निष्ठा लागते. अशाच ठाणे जिल्ह्यातील ५० सामाजिक संस्थांचा सत्कार समारंभ ठाणेवैभव, क्रिएटिव्ह स्माईल्स व सेवा कनेक्ट यांच्या संयुक्त विद्यमाने नुकताच डॉ.काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात अतिशय उत्तमरितीने पार पडला.
या उपक्रमांतर्गत गेल्या वर्षभरात, दर गुरुवारी ठाणे परिसरात कार्यरत असलेल्या विविध सामाजिक संस्थांची माहिती सेवा कनेक्टच्या माध्यमातून ‘ठाणेवैभव’मध्ये प्रकाशित करण्यात येत होती. समाजातील चांगले कार्य लोकांपर्यंत पोहोचवण्याचा हा एक सुंदर प्रयत्न होता. ठाणे महापालिकेतून प्रथम वर्ग अधिकारी म्हणून निवृत्त झालेल्या आणि सध्या सेवा कनेक्टच्या माध्यमातून जास्तीत जास्त सामाजिक संस्था आणि सामाजिक उपक्रमात पुढाकार घेणाऱ्या डॉ. खुशबू टावरी-मोदी यांनी ‘ठाणेवैभव’मधून ५० सामाजिक संस्थांची माहिती दर आठवड्याला प्रसिद्ध केली. या सर्व संस्थांना एकत्र आणून त्यांचा सन्मान करण्यासाठी हा विशेष सोहळा आयोजित करण्यात आला.
कार्यक्रमाला ‘ठाणेवैभव’चे संपादक मिलिन्द बल्लाळ, व्यवस्थापकीय संपादक निखिल बल्लाळ, ‘क्रिएटिव्ह स्माईल्स’चे डॉ. मकरंद देशपांडे, डॉ. शर्मिका देशपांडे, सेवा कनेक्टच्या डॉ. खुशबू टावरी उपस्थित होत्या. डॉ. मकरंद देशपांडे हे ठाणे, मुंबई येथे स्थित एक अनुभवी प्रोस्थोडॉन्टिस्ट आणि इम्प्लांटोलॉजिस्ट आहेत. या सर्वांच्या हस्ते ५० सामाजिक संस्थांचा सत्कार करण्यात आला. या सर्व संस्था समाजासाठी बहुमूल्य सेवा देत आहेत.
‘ठाणेवैभव’मधून दर गुरुवारी प्रत्येकी एका सामाजिक संस्थेची माहिती प्रसिद्ध करण्यात येत होती. या उपक्रमाला सामाजिक संस्थांकडून तसेच वाचकांकडूनही उत्तम प्रसिद्ध मिळत होता. ही बाब खरंतर आता खूप दुर्मिळ होत आहे. आजही लोकांना चांगल्या, सकारात्मक गोष्टी, माहिती समजून घ्यायला, बघायला, वाचायला आणि ती इतरांपर्यंत पोहोचवायला आवडते. ‘ठाणेवैभव’ नेहमीच हे आपले कर्तव्य समजून लोकांपर्यंत किती चांगल्या गोष्टी देता येतील ते पाहत असते. फक्त बातम्या देणे एव्हढेच आमचे काम नसून काही चांगलं घडत असेल तर त्याला प्रसिद्धी दिली गेली पाहिजे या हेतूनेच असे विविध उपक्रम आम्ही ‘ठाणेवैभव’च्या माध्यमातून नियमित राबवत असतो, असे व्यवस्थापकीय संपादक निखिल बल्लाळ यांनी प्रास्ताविकात सांगितले.
ज्या गोष्टीची जास्त चर्चा होते त्याला लोकप्रियता मिळते, समाजात त्याचे नाव होते. पण याचा अर्थ असा नाही की ज्याची चर्चा होत नाही त्यांचे काम दुय्यम असते. जे सर्वांना दिसते त्याला जास्त मदत मिळते. पण मग अशा काही संस्था आहेत ज्यांचे काम समाजासाठी खूप मोलाचे आहे पण त्यांना योग्य ती प्रसिद्धी अथवा योग्य मदत मिळत नाही. तर अशा सर्व संस्थांना एका प्लॅटफॉर्मखाली एकत्रित आणून त्यांचे कार्य समाजापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने सेवा कनेक्टची सुरुवात झाल्याचे डॉ. खुशबू टावरी यांनी सांगितले.
आपल्याकडे ठिपक्यांची रांगोळी फार पूर्वीपासून होतीच. एक-एक ठिपका जोडत जशी सुंदर रांगोळी निर्माण होते. त्याचपद्धतीने समाजाचे एक सुंदर चित्र निर्माण करायचे असेल तर प्रत्येक व्यक्ती एक ठिपका असते आणि ते ठिपके एकमेकांना जोडले गेले तर एक सुंदर रांगोळी तयार होते, एक सुंदर समाज निर्माण होतो. सामाजिक संस्था समाज घडवण्यासाठी खूप मोलाचे काम करत आहेत, त्यांचे कार्य नेहमीच कौतुकास्पद आहे. समाजातील जे विधायक लोक आहेत त्यांना व्यासपीठावर आणले पाहिजे, या विचारानेच ५० सामाजिक संस्थांचे कार्य आम्ही ‘ठाणेवैभव’मधून प्रसिद्ध केल्याचे ‘ठाणेवैभव’चे संपादक मिलिन्द बल्लाळ यांनी सांगितले. आपण सर्वांनाच मदत करू शकत नाही, पण प्रत्येकजण कोणालातरी मदत करू शकतो, या भावनेतूनच सामाजिक संस्था समाजात आपले कार्य करत असतात. आणि याची दखल घेऊनच ‘ठाणेवैभव’ या संस्थांचे कौतुक करत आहे, असेही ते म्हणाले.
सामाजिक संस्था जसं पर्यावरणाचं, समाजाचं आरोग्य जपतात तसंच आम्ही लोकांच्या चेहऱ्यावरचं हसू जपण्याचा प्रयत्न करत आहोत, असे रूट कनाल स्पेशालिस्ट डॉ. शर्मिका देशपांडे म्हणाल्या. जशी आपण आपल्या संपूर्ण आरोग्याची काळजी घेतो तशीच आपण आपल्या दातांची काळजी घेणे, दर सहा महिन्यांनी दंतवैद्यांकडून दातांची तपासणी करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
“सामाजिक संस्था या समाजाचा कणा आहेत आणि त्या निःस्वार्थ भावनेने काम करत असतात. प्रत्येक संस्थेच्या कार्यामागे माणुसकीची एक सुंदर भावना दडलेली असते. अशा संस्थांना एकत्र आणून त्यांचा सन्मान करणं म्हणजे त्यांच्या कार्याला अधिक बळ देणं होय. समाजात सकारात्मक बदल घडवायचा असेल, तर अशा उपक्रमांची नितांत गरज आहे. अशा प्रयत्नांमुळेच एक सशक्त आणि संवेदनशील समाज घडतो”, असे डॉ. मकरंद देशपांडे यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साधना जोशी यांनी अत्यंत सुंदर पद्धतीने केले. क्रिएटिव्ह स्माईल्स कार्यक्रमाला प्रायोजक म्हणून लाभले होते.