बदलापूरमध्ये होणार नवीन उड्डाणपूल

बदलापूर: बदलापूर शहरातील वाढती लोकसंख्या आणि त्या बरोबर वाढणारी वाहने यामुळे होणारी वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी बदलापूर पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या आणखी नवीन उड्डाणपुलाच्या दृष्टीने हालचालींना वेग आला आहे.

मुंबई प्रदेश महानगर विकास प्राधिकरण अर्थात एमएमआरडीएमार्फत या कामासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी निविदा मागवल्या आहेत. सविस्तर प्रकल्प आराखडा आणि निविदा प्रक्रिया व्यवस्थापन करणे, अशी कामे करून घेण्यासाठी ही निविदा मागवण्यात आली आहे.

पुढील सहा महिन्यांत हा आराखडा आणि अहवाल सादर करणे अपेक्षित आहे. यात पुढील ४० वर्षांची वाहतूकीची स्थिती, वाहतूक सर्वेक्षण, उड्डाणपुलाची उभारणी, त्यात आवश्यक बदल, अतिरिक्त मार्गिका यांचा आढावा घेणे अपेक्षित आहे. भूसंपादन, पुनर्वसन, सुविधा गोष्टींचे स्थलांतरण किंवा बदल, प्रकल्प बाधितांशी समन्वय अशी कामेही यात नमूद आहेत.

बदलापूरच्या पश्चिम भागातील बॅरेज रस्त्यावरून नवीन उड्डाणपूल कल्याण-कर्जत रेल्वे मार्ग ओलांडून पूर्वेतील औद्योगिक वसाहतीजवळील होप कंपनीजवळ बदलापूर-कर्जत मार्गावर उतरेल. या मार्गामुळे शहरात पूर्व पश्चिम प्रवास करणे सोपे होणार आहे.

बदलापूर शहराच्या हद्दीतून जवाहरलाल नेहरू न्यास ते बडोदे द्रुतगती महामार्ग आणि बदलापूर ते नवी मुंबई असा महामार्ग जात आहे. शहरात मात्र पूर्व पश्चिम प्रवासासाठी अवघा एक उड्डाणपूल अस्तित्वात आहे. त्यामुळे शहराच्या कोणत्याही टोकापासून दुसऱ्या भागात जाण्यासाठी मध्यवर्ती भागातील उड्डाणपुलावरून प्रवास करावा लागतो. त्यामुळे या उड्डाणपुलावर मोठ्या प्रमाणावर कोंडी होत असते. पावसाळ्यात या उड्डाणपुलावर खड्डे पडल्याने दो्ही दिशांना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात.

त्यामुळे शहरात नव्या उड्डाणपुलांची मागणी होती. याच पार्श्वभूमीवर बदलापूर शहराचे प्रवेशद्वार असलेल्या बेलवली येथील शिवमंदिर तलाव ते कार्मेल शाळेपर्यंत उड्डाणपुलाची उभारणी केली जाते आहे. त्यासाठीची सर्व प्रक्रियाही पार पडली आहे. हा उड्डाणपूल झाल्याने वाहनचालकांना बहुतांश दिलासा मिळेल. त्याचा फायदा अंबरनाथच्या चिखलोली परिसर, अंबरनाथ तालुक्यातील ग्रामीण भागाला होणार आहे. मात्र बदलापूर पूर्वेतील खरवई, पश्चिमेतील बॅरेज रस्ता परिसरातून प्रवास करण्यासाठी मात्र बदलापुरातील सध्याच्या एकमेव उड्डाणपुलाचाच वापर करावा लागेल. त्यामुळे शहराच्या स्थानक परिसरातील कोंडीची समस्या सुटावी यासाठी शहरातील बॅरेज रस्ता ते होप इंडिया असा उड्डाणपूल उभारावा, अशी मागणी होती.

बदलापूर गाव, ग्रामीण भागातील वाहतूक स्थानक परिसर, बस स्थानक पूर्वेकडे खारवई भागाकडे जाण्यासाठी एकमेव उड्डाणपूल कोंडीत अडकतो. नव्या उड्डाणपुलामुळे हा प्रवास काही मिनिटात होईल. त्यामुळे स्थानक परिसरातील कोंडीही सुटणार आहे. उड्डाणपुलावरील भार कमी होईल. त्यामुळे इंधन आणि वेळेची बचत होणार आहे.