उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन
ठाणे: स्वारगेटमध्ये घडलेली घटना अतिशय दुर्दैवी आणि दुर्भाग्यपूर्ण आहे, त्याची निंदा करावी तेवढी कमी. आमच्या बहिणी सुरक्षित राहिल्या पाहिजेत, आमचं सरकार संवेदनशील आहे. हे प्रकरण फास्टट्रॅकवर घेऊन नराधम आरोपीला फाशीची शिक्षा होईल, अशी भूमिका सरकारची असल्याचे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. पात्र लाडक्या बहिणींसाठी लाडकी बहीण योजना कोणत्याही परिस्थितीत बंद होणार नसल्याचे आश्वासनही उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.
ठाणे महापालिका आणि गुरु रविदास महाराज जयंती उत्सव समितीच्या वतीने शुक्रवारी ठाण्यातील डाॅ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात संत रविदास महाराज जंयती उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. यावेळी यांनी स्वारगेटमध्ये तरुणीवर झालेल्या अत्याचाराबाबत प्रतिक्रिया देताना आरोपीला फाशीची शिक्षा कशी होईल यासाठी सरकार प्रयत्न करणार असल्याचे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. मी स्वतः पोलीस आयुक्तांशी बोललो आहे. ही केस फास्टट्रॅकमध्ये घेणार आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार स्वतः यामध्ये लक्ष घालत असून यापुढे लाडक्या बहिणीवर कोणीही अत्याचार करण्याची हिंमत करणार नाही असे काम सरकार करणार असल्याची ग्वाही त्यांनी राज्यातील लाडक्या बहिणींना दिली आहे.
उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी उद्धव ठाकरे यांच्या गंगा स्नानावरही टीका केली आहे. ज्यांना प्रयागराज आणि महाकुंभाशी काही घेणेदेणे नाही, त्यांच्याबद्दल मी काय बोलणार? बाळासाहेबांचे विचार, त्यांची शिवसेना आणि धनुष्यबाण याबरोबर ज्यांनी बेईमानी केली, जे पाप केले ते पाप धुण्यासाठी मी तिथे गेलो होतो. त्यांनी पाप केले बाळासाहेबांचे विचार गहाण ठेवण्याचे, धनुष्यबाण गहाण ठेवण्याचे शिवसैनिकांचे खच्चीकरण करण्याचे. ते पाप लपवायला लंडनमध्ये जातात, त्यांनी गंगेला, महाकुंभला बदनाम केले, त्यांना चांगल्या चांगल्या गोष्टींची पोटदुखी आहे. आम्हाला गद्दार म्हणता मग या महाराष्ट्राच्या जनतेने शिवसेनेचे 60 आमदार निवडून दिले मग तुम्ही काय जनतेला दोष देता, जनतेने विधासभा निवडणुकीत तुमची जागा दाखवलेली आहे, येणाऱ्या निवडणुकीत पार सुपडा साफ होईल असा टोला त्यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता ठाकरे यांना लगावला.