गावगाडा झाला ठप्प
शहापूर: शासनाने आतापर्यंत संगणक परिचालकांना दिलेले कोणतेही आश्वासन न पाळल्याने राज्यातील सुमारे २८ हजार ग्रामपंचायातींमध्ये काम करणाऱ्या सर्व संगणक परिचालकांनी बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले आहे. शहापूर तालुक्यातील ११० ग्रामपंचायतींचे ७५ संगणक परिचालकांनी आज शहापूर पंचायत समिती कार्यालयासमोर निदर्शने केली.
जोपर्यंत संगणक परिचालकांचे प्रश्न मार्गी लागणार नाहीत, तोपर्यंत माघार घेणार नसल्याचे संघटनेचे राज्य अध्यक्ष सिद्धेश्वर मुंडे यांनी प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलतांना सांगितले.
संग्राम व आपले सरकार सेवा केंद्र प्रकल्पाच्या माध्यमातून मागील १२ वर्षांपासून ग्रामपंचायत स्तरावर संगणक परिचालक प्रामाणिकपणे काम करत असताना शासनाने संगणक परिचालकांना ग्रामपंचायतीच्या सुधारित आकृतीबंधात कर्मचारी दर्जा व किमान वेतन देणे, कर्मचारी दर्जा व किमान वेतन मिळेपर्यंत मासिक २० हजार मानधन देणे या प्रमुख मागण्यांकडे शासनाने अनेकवेळा लेखी व तोंडी आश्वासन देऊन सुद्धा दुर्लक्ष केले. सुधारित आकृतीबंधाची फाईल धूळ खात असून अनेक जिल्हा परिषदांकडून अभिप्राय दिलेला नसल्याने हा शासनाचा व प्रशासनाचा वेळकाढूपणा असल्याची भावना संगणक परिचालकांमध्ये आहे. एकीकडे कर्मचारी दर्जा आणि किमान वेतन द्यायचे नाही आणि दुसरीकडे महागाईच्या काळात केवळ ६,९३० रुपये मासिक मानधन तेही केव्हाच वेळेवर मिळत नाही, ग्रामस्तरावर काम करणारे ग्रामपंचायत कर्मचारी, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, पोलिस पाटील आणि कोतवाल यांच्या मानधनात वाढ झाली असताना संगणक परिचालकांकडे दुर्लक्ष होत असल्याची भावना संगणक परीचालकांनी व्यक्त केल्या.
१७ नोव्हेंबर २०२३ पासून राज्यातील सर्व संगणक परिचालक बेमुदत संपावर गेले असून जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाहीत तोपर्यंत हे कामबंद आंदोलन सुरूच राहणार असल्याचे संघटनेचे राज्यअध्यक्ष सिद्धेश्वर मुंडे यांनी बोलताना सांगितले.