अनधिकृत बांधकामांवर जीपीएस सॅटेलाईट ठेवणार नजर

इतर प्राधिकरणांच्या हद्दीतही ठामपा करणार कारवाई

ठाणे : शहरातील अनधिकृत बांधकामांना आळा घालण्यासाठी जीपीएस सॅटेलाईट प्रणालीचा अवलंब करावा. अनधिकृत बांधकाम शहरात होत असल्याचे निदर्शनास येताच ते तत्काळ निष्कसित करण्याच्या स्पष्ट सूचना आयुक्तांनी सहाय्यक आयुक्तांना दिल्या आहेत. वनविभाग, खार जमिनीच्या जागेवर नव्याने होणाऱ्या अनधिकृत बांधकामांबाबत संबंधित विभागाशी पत्रव्यवहार करुनही कारवाई न झाल्यास त्या ठिकाणी महापालिकेच्या माध्यमातून कारवाई करण्याच्या सूचनाही आयुक्त सौरव राव यांनी यावेळी दिल्या.

शहरातील अनधिकृत बांधकामांचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून सुटलेला नाही. विशेष करून खाडीच्या पलिकडे कळवा, मुंब्रा आणि दिवा परिसरात मोठ्या प्रमाणात बांधकामे झाली असून बुधवारी महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी कळव्यातील अनाधिकृत बांधकामे, नालेसफाई तसेच पाणीपट्टी वसुलीचीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी कळव्यातील विविध प्रकल्पांची पाहणी देखील केली. यावेळी कळवा प्रभाग समिती कार्यक्षेत्रातील पाणीपट्टी व मालमत्ता करवसुली ही 100 टक्के वसुली झालीच पाहिजे, या दृष्टीने कार्यवाही करावी तसेच मान्सूनपूर्व करण्यात येणारी कामे, नालेसफाई, तातडीने सुरू करण्याचे निर्देशही आयुक्तांनी आढावा बैठकीत दिले.

ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून कळवा परिसरात झालेली व होत असलेली विकास कामे तसेच संपूर्ण शहराची भौगोलिक परिस्थिती, कळवा पूर्व परिसरातील पारसिक डोंगर व तीन बाजूंनी वेढलेला खाडी किनारा या दृष्टीने शहराचे क्षेत्रफळ आदी सर्व माहिती सादरीकरणाच्या माध्यमातून आयुक्त सौरभ राव यांनी जाणून घेतली. सद्यस्थितीत कळवा प्रभाग समितीच्या माध्यमातून मालमत्ता करवसुली ७५ टक्के व पाणीपट्टी ६२ टक्के असल्याबद्दल आयुक्तांनी नाराजी व्यक्त करीत पाणीपट्टी व मालमत्ता करवसुली 100 टक्के झालीच पाहिजे या दृष्टीने कृती आराखडा करण्याचे निर्देश आयुक्त राव यांनी यावेळी दिले. प्रभाग समितीत नागरिकांकडून येणाऱ्या तक्रारींचा आढावा घेवून ज्या तक्रारींचा निपटारा प्रभाग समिती स्तरावर करणे शक्य आहे तो जलदगतीने करावा. तसेच तक्रारीचा निपटारा झाल्यावर संबंधित तक्रारदाराला त्याची माहिती देण्यात यावी. तसेच ज्या तक्रारी मुख्यालयामार्फत सोडविणे आवश्यक आहे, त्या संबंधित विभागाकडे वर्ग कराव्यात. शहरात होणाऱ्या अनधिकृत बांधकाम/ अतिक्रमण यांचा मासिक अहवाल तयार करुन तो सादर करण्याचे निर्देशही सहाय्यक आयुक्तांना सदर बैठकीत देण्यात आले.

पावसाळा तोंडावर आला असल्याने शहरातील धोकादायक इमारतींचा आढावा घ्यावा. मोडकळीस आलेल्या इमारतींचे त्रयस्थ संस्थेद्वारे परीक्षण करुन त्या निष्कासित करणे आवश्यक असेल तर त्या पावसाळ्याच्या अगोदर निष्कसित कराव्यात. तसेच वास्तुविशारदाकडून धोकादायक इमारतींचे त्रुटीबद्ध पध्दतीने मुल्यांकन करुन घ्यावे. जर मुल्यांकन करुनसुद्धा अप्रिय घटना घडली तर त्यांच्याविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्याच्या लेखी सूचनाही त्यांना देण्यात याव्यात असेही आयुक्त श्री. राव यांनी नमूद केले. ज्या इमारती अतिधोकादायक आहे, त्या इमारतीतील नागरिकांना स्थलांतरित करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

प्रभाग समितीअंतर्गत असलेल्या सर्व नाल्याच्या साफसफाईला लवकर सुरूवात करावी. पावसाळ्यात सखल भागात पाणी साचण्याची जी ठिकाणे आहेत, त्या ठिकाणी पाणी साचल्यावर आवश्यकतेनुसार पंप उपलब्ध करण्याच्या दृष्टीने नियोजन करण्याबाबत आयुक्तांनी सूचित केले. तसेच महापालिकेव्यतिरिक्त इतर शासनाच्या विभागाच्या अखत्यारित असलेल्या रस्त्यांवर खड्डे पडल्यास त्याची दुरुस्ती करण्याबाबत संबंधित विभागाशी पत्रव्यवहार करण्याच्या सूचनाही आयुक्त श्री राव यांनी दिल्या.

कळवा प्रभाग समितीतील सर्व कामांचा आढावा घेतल्यानंतर आयुक्त सौरभ राव यांनी महापालिका अधिकाऱ्यांसमवेत परिसराची पाहणी केली. पावसाळ्यात विटावा सबवे येथे पाणी साचून वाहतूक कोंडी होते, त्या ठिकाणची पाहणी करुन या ठिकाणी पाण्याचा निचरा होण्यासाठी बसविण्यात आलेल्या यंत्राची पाहणी केली. तदनंतर नव्याने सुरू करण्यात आलेल्या पुलाची माहिती घेतली. कळवा पुलाखाली तयार करण्यात आलेल्या वॉटरफ्रंट प्रकल्पाची पाहणी करुन या ठिकाणी तयार करण्यात आलेल्या उद्यानाचे कौतुक केले. खारीगांव टोलनाका येथील ठाणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गाच्या सुरू असलेल्या कामाची देखील पाहणी केली.