जीपी पारसिक सहकारी बँकेची सुवर्ण महोत्सवी याशोगाथा

21 मे रोजी गडकरी रंगायतन येथे सांगता समारंभ कार्यक्रम

ठाणे: स्वर्गीय गोपीनाथ शिवराम पाटील यांनी स्थापन केलेल्या जीपी पारसिक सहकारी बँकेचा सुवर्ण महोत्सवी सांगता समारंभ आणि स्मरणिका प्रकाशन सोहळा येत्या 21 मे, 2022 रोजी गडकरी रंगायतन, ठाणे येथे सायंकाळी होत असल्याची माहिती आज एका पत्रकार परिषदेत बँकेचे अध्यक्ष नारायण गावंड यांनी दिली.

कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील, कॅबिनेट मंत्री जयंत पाटील, नगरविकास तथा ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड उपस्थित राहणार आहेत. पत्रकार परिषदेला उपाध्यक्ष प्रकाश पाटील, संचालक रणजीत गोपीनाथ पाटील, दशरथ घरत, दशरथ पाटील, नामदेव पाटील, कय्युम चेऊलकर, नवनाथ पाटील, केसरीनाथ घरत, विक्रम पाटील, डॉ. संजय पोपेरे, संचालिका राजश्री पाटील, शशिकला पाटील, तज्ञ संचालक सीए रमाकांत लाहोटी, विशाल भानुशाली उपस्थित होते.

स्वर्गीय गोपीनाथ शिवराम पाटील हे कळवा मध्यवर्ती ग्राहक सहकारी संस्थेचे चेअरमन म्हणून निवडून आले त्यावेळेस त्यांना सहकाराची आवड निर्माण झाली. कळवे येथे त्यांचा जन्म झाला. ते ठाणे तालुक्यातील प्रथम एम.कॉम. एलएल.बी. झालेले पहिले विद्यार्थी होते. कळवे येथे स्वातंत्र्यसैनिक गोपाळराव पाटील यांनी त्या निमित्ताने त्यांचा सत्कार समारंभ आयोजित केला होता. त्यावेळी भाऊसाहेब वर्तक व जिल्हा परिषद अध्यक्ष पा.श. देशमुख हे कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. सत्कार समारंभाचे वेळी प्रमुख अतिथींनी स्वर्गीय गोपीनाथ पाटील यांचे कौतुक केले. तसेच कळवे गावातील आपण उच्च शिक्षण घेतलेले प्रथम पदवीधर आहात. याचा फायदा कष्टकरी, कामगार वर्ग तसेच तरुणांना प्रेरणा मिळावी आणि समाजकार्य करावे असे सांगितले. आपण सामाजिक बांधिलकी म्हणून सामाजिक कामातही आपला सहभाग असावा, आपल्या ज्ञानाचा उपयोग समाजाच्या फायद्यासाठी व्हावा अशी भावना अतिथींनी व्यक्त केली. त्यावेळेस त्यांच्या विचारांचा प्रभाव स्वर्गीय गोपीनाथ शिवराम पाटील यांच्यावर पडला. त्यांना स्वातंत्रसैनिक गोपाळराव पाटील यांनी सहकाराची जबाबदारी दिली. त्यावेळी त्यांचे सहकारी म्हणून वाय.पी.पाटील, प्राध्यापक सोमण सर, गोवर्धन म्हात्रे असे चांगले मित्र लाभले. यातून सहकार क्षेत्रात तोट्यात असलेली कळवा मध्यवर्ती ग्राहक सहकारी संस्था नफ्यात आणली. त्यावेळेस त्यांचा आत्मविश्वास वाढला. अशातच कोल्हापूर येथील शेतकरी संघांतून चालणाऱ्या संस्थाना भेट देण्याची त्यांनी योजना आखली. तेथे शहाजी भोसले, वाय.पी. पाटील, गोवर्धन म्हात्रे यांच्यासह भेट दिली. तेथून ते एक वेगळा विचार घेऊन आले. आपणही सहकारी बँक स्थापन करु शकतो असा त्यांना विश्वास वाटला. पुढे बँक स्थापन करीत असताना कळवा, खारीगांव येथे घरोघरी जावून बँकेचे महत्व सांगून शेअर्स जमा केले. पुढे कळवा येथे पटेल बिल्डींगमध्ये पहिली छोटी शाखा काढली. बँकेला कमल खराडे, नारायण गावंड, वि.वा.काळकर यांच्यासारखे अधिकारी व बेंद्रे हे शिपाई लाभले.
इवल्याशा लावलेल्या रोपट्याचा शुभारंभ अॅड. प्रभाकर हेगडे व भाऊसाहेब वर्तक यांच्या उपस्थितीत झाला. आज त्याचा वटवृक्ष झाला असून सध्या बँकेच्या 91 शाखा कार्यरत आहेत. आज बँकेच्या शाखा मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूर, नागपूर या जिल्ह्यात तर गोवा व कर्नाटक राज्यातही शाखा आहेत. तरुणांचा उत्कर्ष व्हावा, व्यापा-यांना बँकींग क्षेत्राचा लाभ व्हावा, सिडकोच्या माध्यमातून आलेल्या पैशाचा विनियोग व्हावा या उद्देशाने कळवा ते बेलापूर प्ट्टयातील पारसिक डोंगराच्या नावाने बँकेचे नामकरण पारसिक या नावाने करण्यात आले.

माहे मार्च 2022 अखेर बँकेचा स्वनिधी रुपये 603 कोटी आहे. ठेवी रुपये 4287 कोटी तर कर्जे 1848 कोटी आहेत. एकूण व्यवसाय 6135 कोटी आहे. निव्वळ नफा रुपये 50.61 कोटी आहे. नेट एनपीए शून्य टक्के तर सी.आर.ए.आर. 21.60 टक्के इतका आहे. तसेच बँकेचे एकूण सभासद 1 लाख 2 हजारांहून अधिक असून ठेवीदार व कर्जदार 5 लाख 23 हजाराहून अधिक आहेत. एकूण 885 हून अधिक कर्मचारी वर्ग खातेदारांच्या सेवेकरिता कार्यरत आहे.

बँक सर्व प्रकारचे डिजिटल प्रॉडक्ट खातेदारांना पुरविते. बँक पारदर्शकता, विश्वास, ग्राहकसेवा, उत्कृष्टता, टीम वर्क या तत्त्वांना अनुसरून कार्य करीत आहे. तसेच बँकेचे एटीएम ग्राहकांच्या सेवेसाठी उपलब्ध आहेत.

आज जी बँकेची यशस्वी वाटचाल सुरु आहे त्याचे सर्व श्रेय स्वर्गीय गोपीनाथ शिवराम पाटील यांची दुरदृष्टी, नियोजन यालाच जाते. आपल्या कर्मचा-यांना विश्वासात घेऊन त्यांनी मार्गदर्शन करुन त्यांनी बँकेविषयी आपुलकी निर्माण केली. यामध्ये प्रथम सर्व संचालक मंडळाचे सहकार्य लाभले. त्यांच्या निधनानंतर त्यांचे चिरंजीव रणजीत पाटील यांनी बँकेची धुरा हाती घेतली. यानंतर सध्याचे संचालक मंडळही बिनविरोध निवडून आले आहे. हे स्वर्गीय गोपीनाथ शिवराम पाटील यांनी घातलेला पाया आहे हे त्याचे प्रतिक आहे.
यावर्षीही संचालक मंडळाची निवडणूक बिनविरोध होऊन अध्यक्ष नारायण गावंड व उपाध्यक्ष प्रकाश पाटील यांची बिनविरोध निवड झाली. याचे श्रेय म्हणून ठेवीदार, खातेदार यांचा स्वर्गीय गोपीनाथ शिवराम पाटील यांच्याबद्दल असलेला दृढ विश्वास होय.

सुवर्ण महोत्सवी वर्षापर्यंतची आजवरची वाटचाल सोपी नव्हती. परंतु कुशल नेतृत्व, निस्वार्थी वृत्ती, पारदर्शकता, मेहनत व चिकाटीच्या आधारे बॅंकेने हा खडतर प्रवास पूर्ण केला आहे. बॅंकेच्या यशात मेहनती कर्मचा-यांसोबतच ग्राहक, भागधारक व हितचिंतकांचा देखील लाखमोलाचा वाटा आहे. ग्राहकांचा बॅंकेप्रती असलेला विश्वास पुढील काळात वृध्दींगत करून शतक महोत्सवी वाटचालीकडे दमदार वाटचाल करण्याचा संकल्प आहे.

मानाचे आणि प्रतिष्ठेचे पुरस्कार
एनपीसीआय बॅंकींग फ्रंटियर मॅगझिन लोकमत वृत्तपत्र बिस्टिंग मेडिया सीएसआय आयटी 2020 पुरस्कार.
महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंक असोसिएशनचा बॅंकेच्या गुंतवणूक, ठेवी, दिलेली कर्जे, नफा, वसूली इत्यादी निकषांवर आधारित पदमभूषण वसंतदादा पाटील पुरस्कार मुंबई विभागातून सन 1995 ते 1996, 1996 ते 1997, 1997 ते 1998 प्रथम क्रमांकाचा बेस्ट अर्बन को ऑपरेटिव्ह बॅंक पुरस्काराची हॅटट्रीक.
दि महाराष्ट्र अर्बन कोऑपरेटिव्ह बॅंक यांचा सर्वोत्कृष्ट बॅंक पुरस्कार सलग तीन वर्षे सन 2014 ते 2015, 2015 ते 2016, 2016 ते 2017.
राजाराम बापू पाटील युवक मुद्रा राज्यस्तरीय सहकारी बॅंक प्रतियोगिता पुरस्कार स्पर्धेतील महाराष्ट्रातील नागरी सहकारी बॅंकांमधून रजत महोत्सवोत्तर बॅंक खुला वर्ग या अंतर्गत दुसरे पारितोषिक प्राप्त.
महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंक असोसिएशनतर्फे उत्कृष्ट नागरी सहकारी बॅंकेच्या स्पर्धेत कोकण विभागातून कै. पदमभूषण वसंतदादा पाटील उत्कृष्ट नागरी सहकारी बॅंक पुरस्कार 2008-2009.
दि महाराष्ट्र अर्बन कोऑपरेटिव्ह बॅंक कोऑपरेटिव्ह फेडरेशनने रूपये 50 कोटींच्यावर ठेवी असलेल्या बॅंक गटातून बॅंकेस प्रथम पुरस्कार प्राप्त सन 2009-2010.
बॅंकींग फ्रंटियर्स या संस्थेने मोठया नागरी सहकारी बॅंका या विभागात बॅंकेस एक्सलन्स इन रिकव्हरी अॅन्ड एन.पी.ए. मॅनेजमेंट व ग्रीन इनिशिएटिव्ह या करीता गौरविले आहे.
बॅंकींग फ्रंटियर्स सन 2013च्या बेस्ट युथ चेअरमन अॅवार्ड पुरस्काराने बॅंकेचे तत्कालिन अध्यक्ष श्री. रणजित गोपिनाथ पाटील यांचा गौरव.
सहकारी बॅंकेच्या ठेवी रूपये 1001 कोटी ते रूपये 1750 कोटीपर्यंत या विभागात 2013चा बॅंको पुरस्कार.
2014 साली दुसऱया क्रमांकाचा बॅंको पुरस्कार
नॅशनल पेमेंट कोर्पोरेशन ऑफ इंडीया यांच्यातर्फे संपूर्ण देशातील सहकार बॅंकांमधून जास्तीत जास्त रूपये डेबिट कार्ड वितरित करणारी बॅंक म्हणून विशेष पुरस्कार.
राजाराम बापू युवक मुद्रा राज्यस्तरीय सहकारी बॅंक प्रतियोगिता पुरस्कार.
स्पर्धेतील महाराष्ट्रातील नागरी सहकारी बॅंकांमधून रजत महोत्सवोत्तर बॅंक खुला वर्ग या अंतर्गत बॅंकेला दुसा-या क्रमांकाचे बक्षिस प्राप्त.