मुंबई: भाजपाच्या राम नाईकांचा दणदणीत पराभव केलेला अभिनेते गोविंदा आज शिंदेंच्या शिवसेनेत आले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गोविंदा यांचे स्वागत केले. आज वर्षा बंगल्यावर महत्त्वाचे प्रवेश झाले आहेत. त्याची सुरुवात गोविंदा यांच्या पक्ष प्रवेशाने झाली आहे.
मागील काही दिवसांपासून अभिनेता गोविंदा हे राजकारणात पुन्हा प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या.
आज शिवजयंतीच्या अत्यंत पवित्र दिनी आपले सगळ्यांचे लाडके आणि लोकप्रिय अभिनेते गोविंदाजी हे शिवसेनेत आले आहेत. मी त्यांचं मनापासून स्वागत करतो. डाऊन टू अर्थ असलेले आणि सगळ्यांना आवडणारे गोविंदा शिवसेनेत आले आहेत. सगळ्याच समाजात लोकप्रिय असलेले गोविंदा यांचं मी स्वागत करतो आणि त्यांचं अभिनंदन करतो. त्यांना शुभेच्छाही देतो. असं एकनाथ शिंदेंनी म्हटलं आहे.
“मी आज या पक्षात आलो आहे. १४ वर्षांचा वनवास संपला आहे आणि रामराज्यात आलो आहे असं मला वाटतं आहे. जी जबाबदारी मला दिली जाईल ती प्रामाणिकपणे पार पाडेन असं गोविंदा यांनी म्हटलं आहे. आजच्या दिवशी मी पक्षात प्रवेश करणे ही मला वाटतं की देवाची कृपा आहे आणि प्रेरणा आहे. मी २००४ ते २००९ या कालावधीत राजकारणात होतो. त्यानंतर बाहेर पडलो. मला वाटलं होतं मी या बाजूला काही दिसणार नाही. पण २०१० ते २०२४ या १४ वर्षांच्या वनवासानंतर नवी सुरुवात करतो आहे. मी पुन्हा राजकारणात आलो आहे, शिवसेनेत आलो आहे, अशी प्रतिक्रिया गोविंदा यांनी दिली.