स्थानिक अधिकाऱ्यांवर रिक्त जागांचा अतिरिक्त भार
ठाणे : एकेकाळी ठाणे महापालिकेत प्रतिनियुक्तीने जाण्यासाठी राज्य सरकारमधील अधिकाऱ्यांमध्ये चढाओढ असे, परंतु सध्या मात्र मोठ्या प्रमाणात होणारा राजकीय हस्तक्षेप आणि महापालिकेची खालावलेली आर्थिक स्थिती यामुळे ठाणे महापालिकेत प्रतिनियुक्तीवर येण्यास एकही सहायक आयुक्त तयार नसल्याने अनेक विभागाचा कार्यभार एका-एका अधिकाऱ्याला सांभाळावा लागत आहे
राज्य सरकारने नुकत्याच ३० उपायुक्त आणि सहायक आयुक्तांच्या बदल्या केल्या आहेत. महापालिकेतील एका अधिकाऱ्याची बदली झाली आहे, परंतु त्यांच्या जागी दुसरा कुठलाही अधिकारी यायला तयार नाही. नवी मुंबई, वसई-विरार या महापालिकांसह नगरपरिषद आणि नगरपालिकेत अधिकारी बदलीने गेले आहेत, परंतु ठाणे महापालिकेत मात्र एकही अधिकारी आला नाही.
महापालिकेत शासनाचे पाच, निवडीचे तीन आणि पदोन्नतीचे स्थानिक आठ अधिकारी अशा १६ सहायक आयुक्त पदाची पदे महापालिकेत आहेत. प्रतिनियुक्तीवरील पाच अधिकाऱ्यांपैकी फक्त दोनच अधिकारी सध्या कार्यरत आहेत. रिक्त जागांचा पदभार इतर अधिकारी सांभाळत आहेत. महापालिकेच्या नऊ प्रभाग समित्यांमध्ये नऊ सहायक आयुक्त असून रिक्त पदाच्या जागांचा भार इतर विभागातील अधिकाऱ्यांवर पडला आहे. विभाग स्थानिक अधिकारी आणि प्रतिनियुक्तीवरील अधिकारी कमी असल्याने अनेक अधिकारी दबावाखाली असून त्यात राजकीय हस्तक्षेप मोठ्या प्रमाणावर वाढल्याने अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना महापालिकेत काम करणे मुश्किल झाले असल्याची भावना अधिकारी व्यक्त करत आहेत. याची कल्पना राज्य सरकारमधील अधिकाऱ्यांना आल्याने ठाणे महापालिकेत येण्यासाठी कोणीही इच्छुक नसल्याचे बोलले जात आहे.