ठाण्यात गौराईसह लाडक्या बाप्पाला निरोप

३७ हजार गणपती तर १५ हजार गौरीचे विसर्जन

ठाणे: गणेश चतुर्थीला घरोघरी विराजमान झालेले लाडके बाप्पा आणि माहेरवाशीण म्हणून मुक्कामी आलेल्या गौराईला आज गणेशभक्तांनी साश्रु नयनांनी निरोप दिला.

ठाण्याच्या कृत्रिम तलाव,रेतीबंदर आणि खाडी किनारी लाडक्या बाप्पाचे विसर्जन गुरुवारी रात्री उशीरापर्यंत पार पडले. ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत ३७ हजार बाप्पांसह १५ हजार गौरी मातांना निरोप देण्यात आला.

ठाणे, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी, अंबरनाथ, बदलापूर तसेच ग्रामीण भागातील रस्त्यांवर भरपावसात बँजो, ढोल आणि ताशांच्या गजरात गुलाल उधळत मिरवणुका काढण्यात आल्या. पोलीस प्रशासनानेही चौकाचौकात तसेच विसर्जन घाटावर पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात ठेवला होता. सुरक्षिततेच्या दृष्टीने विसर्जन घाटांवर सीसीटीव्ही कॅमेऱ्याद्वारे नजर ठेवण्यात आली होती. दीड दिवसांच्या बाप्पांच्या विसर्जनाला कृत्रिम तलावांमधील श्रींच्या विसर्जनाकड़े भाविकांचा वाढ़ता प्रतिसाद लक्षात घेत गौरी-गणपती विसर्जनाच्या दिवसांसाठीही प्रशासनाने चांगली कंबर कसली असल्याचे पाहण्यास मिळाले.

पुढच्या वर्षी बाप्पा ११ दिवस लवकर येणार

गणपती बाप्पा मोरया … पुढच्या वर्षी लवकर या ! ही भक्तांची हाळी यंदा गणपती बाप्पाने ऐकली असून पुढल्या वर्षी गणपती बाप्पा ११ दिवस लवकर येणार आहेत. पुढच्या वर्षी श्रीगणेश चतुर्थी बुधवार २७ ऑगस्ट २०२५ रोजी येणार असल्याचे पंचांगकर्ते दा.कृ.सोमण यानी सांगितले. पुढच्या वर्षी गौरी- गणपतीचे विसर्जन सातव्या दिवशी होणार असून २ सप्टेंबर २०२५ रोजी गौरी-गणपतीचे विसर्जन होणार आहे. तसेच पुढच्या वर्षी अनंत चतुर्दशी ११ व्या दिवशी म्हणजेच शनिवार ६ सप्टेंबर २०२५ रोजी येणार आहे.