भल्या पहाटे मालवाहतुकीच्या गाड्यांनी स्टेशन परिसराची कोंडी; बस, रिक्षा आणि पादचारी त्रस्त

ठाणे: परगावातून ठाण्यात भाज्या आणणारे टेम्पो पहाटे ४ ते सकाळी ८ जांभळी नाका स्टेशन रोडवर ठाण मांडून असल्याने बस, रिक्षा आणि चाकरमान्यांना कोंडीचा नाहक सामना करावा लागतो. या वाहनांना छत्रपती शिवाजी महाराज मैदानात तात्पुरता थांबा दिल्यास वाहतूक कोंडीची समस्या कायमस्वरूपी सुटू शकते, अशी मागणी जागरूक नागरिक करत आहेत.

दररोजच्या चाकरमान्यांना याचा खुपच त्रास होतोच शिवाय त्यांच्या नेहमीच्या ठरलेल्या वेळेच्या लोकल चुकतात. त्यामुळे त्यांची ठरलेल्या वेळेआधी हजेरी न लागता लेट मार्क लागतो. हा प्रकार गेल्या कित्येक वर्षांपासून सुरु आहे त्यामुळे ठाणे वाहतूक पोलिसांनी यांच्यावर ठोेस कायदेशीर कारवाई करावी, सकाळ-सायंकाळ ठराविक वेळी मोक्याच्या ठिकाणी वाहतूक पोलिस व स्थानिक पोलिसांनी अशा वाहनांना, रिक्षांना अजिबात थांववू नये अशी जोरदार मागणी ठाणेकरांनी केली आहे.

अग्यारी लेन ते मासुंदा तलावासमोरील रस्ता आणि महागिरी ते जिल्हा परिषद कार्यालयापर्यंतच्या रस्त्यांवर पहाटेपासून सकाळी ८ पर्यंत विविध प्रकारच्या भाज्या आणि पालेभाज्यांच्या पिक अप गाड्या येण्यास सुरुवात होते. या पिक अप आणि तीनचाकी टेंपो बिनधास्त कुठेही उभ्या करुन रस्ते अडवतात. चहापाणी किंवा आराम करण्यासाठी गेलेला चालक तासन्तास गायब झालेला असतो. याच वेळेत वाहतूक पोलीसही गायब असतात. त्यामुळे ऐन धावपळीच्या वेळेत चाकरमानी बस आणि रिक्षात अडकून पडतो.

भायखळा, दादर, पनवेल, भिवंडी, शहापूर, वाडा, पुणे, नाशिक, त्र्यंबकेश्वर, मालेगाव येथील शेतात पिकवल्या जाणा-या विविध भाज्या इतकेच नव्हे तर विविध प्रकारची शोभिवंत फुले, देवासाठी लागणारी विविध फुले, तुळस, लहान-मोठ्या गुच्छांसाठी लागणारी फुले, फुलांसाठी लागणारे इतर साहित्यही दररोज ठाण्यात मासुंदा तलाव, रेल्वे स्टेशन रोड, सिडको रस्ता, दादोजी कोंडदेव स्टेडियम व या परिसरांतील गल्ल्यांमध्ये अनेक वाहनांतून पोहचते. तेथे आलेल्या घाऊक आणि किरकोळ मालांची चढ-उतार आणि वाटणी करण्यासाठी लहान-मोठी वाहने रस्त्यांवरच सहा-आठ तास थांबवली जातात. माल उतरवण्याच्यावेळी चालक विश्रांंती, भोजनासाठी गेल्याने ही वाहने लहान-मोठा रस्ता अडवून ठेवतात. स्टेशन रोडवर आणि मासुंदा तलावासमोर मोठी वाहने थांबवल्याने टीएमटीच्या बसगाड्यांच्या रांगा लागलेल्या असतात. वाहनांच्या रांगा आणि गर्दीतून मार्ग काढून वेळेत लोकल पकडणे हे ठाणेकरांना गेल्या काही वर्षांपासून ‘दिव्य’झाले आहे.
ठाणे कोर्ट नाक्यापासून ते महागिरी, स्टेशन रोड या परिसरात विविध वस्तुंच्या घाऊक बाजारपेठा असल्याने दूरवर आणि जवळ राहणारे ठाणेकर किरकोळ फळ-भाज्या व इतर सामान खरेदीसाठी येथे हमखास येतात. त्यांचीही लहान वाहने ‘पार्क’करण्यासाठी वाहनतळ नसल्यामुळे ते वाहत्या रस्त्यांवरच वाहने थांबवून खरेदी व्यवहार करत असल्याचे दिसून येते.

ठाण्यात सर्वात मोठा घाऊक बाजार महागिरी येथे आहे. ब-याच वर्षांपासून या बाजाराचा चेहरा-मोहरा बदललेला नाही. याच बाजाराला खेटून किरकोळ बाजार आहे. या दोन्ही बाजारांमध्ये येणा-या मल्टी अ‍ॅक्सल ट्रक्सना प्रवेश करण्याची वेळ दुपारी एक वाजेनंतर आहे. सकाळी ८ पासून ते दुपारी १ वाजेपर्यंत दुचाकी, लहान वाहने, छोटे टेम्पो, पिक अप, रिक्षा यांनाच प्रवेश करण्याची मुभा वाहतूक पोलिसांनी दिली आहे. परंतु, मल्टी किंवा सहा चाकी ट्रक्स, चार चाकी टेम्पो वाहनांचे चालक रात्री १० वाजल्यानंतर या बाजारात घुसखोरी करुन त्यांची वाहने आडवी-तिडवी उभी करतात व अन्य वाहनांचा आतमध्ये प्रवेश होणारच नाही, हे पाहतात. येथील काही दुकानदारांचाही त्यांना पाठिंबा आहे, असे सांगण्यात आले. यामुळे लहान वाहनचालकांचे येथे बरेचदा खटके उडतात. अशावेळी एकही वाहतूक पोलीस महागिरीमध्ये आढळत नाही.