चांगल्या संस्कारांतूनच उत्तम चित्रपटांची निर्मिती-केदार शिंदे

‘ग गप्पांचा’ शृंखलेतील १६वे पुष्प

ठाणे: श्रीयुत गंगाधर टिपरे, सही रे सही, अगं बाई अरेच्चा, महाराष्ट्र शाहीर आणि अलिकडेच आलेला बाईपण भारी देवा अशा अनेक उत्तम कलाकृती ज्यांनी रसिकांना बहाल केल्या आणि शाहिर साबळे यांचे नातू असूनही आपली वेगळी ओळख कलाक्षेत्रात ज्यांनी निर्माण केली असे केदार शिंदे, यांनी ‘ग गप्पा’ ह्या शृंखलेतील १६ व्या पुष्पास हजेरी लावून प्रेक्षकांशी दिलखुलास गप्पा मारल्या.

जितेंद्र वैद्य ह्यांच्या मूळ संकल्पनेतून साकारलेला हा कार्यक्रम २१ नोव्हेंबर २०२३ रोजी ज्ञानराज सभागृह येथे पार पडला. बालपणापासून घड़लेले चांगले, सांगितिक, कलेचे संस्कार आणि स्वामी समर्थांवरील दृढ़ श्रद्धा ह्यांचे मोठे योगदान त्यांच्या ह्या यशात आहे असे केदार यांनी नमूद केले. वयाच्या साधारण तीन वर्षांपासून महाराष्ट्राची लोकधारेतील त्यांचा सहभाग, वैमानिक होण्याची प्रबळ इच्छा, उत्तम नृत्यकला आणि आवाज अवगत असतानाही यशस्वी दिग्दर्शकाच्या खुर्चीपर्यंतचा प्रवास रंजकपणे उलगडला. ह्याच बरोबर आधीच्या काळातील सहजता लुप्त झाली आहे, जुन्या गोष्टीचे डॉक्यूमेंटेशन न झाल्याने आपला झालेला तोटा ह्या विषयाबद्दलची खंत विस्तृतपणे मांडली. आजही स्त्रियांना काही प्रमाणात समान वागणूक दिली जात नाही, काही गोष्टीबद्दल अप्रूप बाळगले जाते या मुद्द्यावर उदाहरणासकट भाष्य केले.

भरत जाधव, अंकुश चौधरी ह्या त्यांच्या जिवलग मित्रांबद्दल, अजय अतुल ह्याच्याबरोबर असलेल्या लॉंग असोसिएशनबद्दल आणि त्यांची मुलगी सना ह्यांच्याबद्दल मनमोकळेपणाने गप्पा मारल्या. त्यांचेच एक लोकप्रिय गाणे ‘मल्हारवारी मोतियाने द्यावी भरून …’ ज्यात खुद्द शाहिर साबळे ह्याचा आवाज आहे. त्याचा एक गमतीशीर किस्सा सांगितला. यश वैद्य ह्यांनी त्यांची मुलाखत घेत त्यांना मोजक्याच प्रश्नातून छान बोलके केले. अशा उत्तम रंगलेल्या कार्यक्रमची सांगता शाहिर साबळे यांच्याच 1952 सालच्या एका अफलातून गाण्याने करून उपस्थित सर्वांचे मन जिंकले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मराठे ज्वेलर्स आणि जाई काजळ ह्या प्रायोजकांबरोबरच मिलिंद कऱ्हाडे, पूर्वा कर्वे-बापट, आमोद दांडेकर, घन:श्याम दीक्षित, मंगेश कोळी, पुर्वा धारप, अमृता संभुस, रश्मी जोशी, अद्वैत मळेकर, रश्मी कासार या कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.