ठाणे: जनमानसात लोकप्रिय असलेल्या जीपी पारसिक सहकारी बँकेचे सुवर्ण महोत्सवी वर्ष २१ मे, २०२१ रोजी सुरु झाले. २१ मे, २०२२ रोजी सुवर्ण महोत्सवी वर्षाचा सांगता सोहळा व स्मरणिका प्रकाशन, राम गणेश गडकरी रंगायतन, ठाणे येथे मोठ्या उत्साहात झाले.
सोहळ्यास कपिल पाटील (केंद्रीय राज्यमंत्री, पंचायत राज, भारत सरकार), जितेंद्र आव्हाड (कॅबिनेट मंत्री, गृहनिर्माण महाराष्ट्र राज्य), आमदार प्रताप सरनाईक, तसेच जीपी पारसिक सहकारी बँकेचे अध्यक्ष नारायण गावंड, उपाध्यक्ष प्रकाश पाटील, संचालक रणजीत पाटील, दशरथ घरत, दशरथ पाटील, नामदेव पाटील, विक्रम पाटील, कय्युम चेऊलकर, नवनाथ पाटील, केसरीनाथ घरत, पाम पाटील, डॉ. संजय पोपेरे, रमाकांत लाहोटी, विशाल भानुशाली, संचालिका राजश्री पाटील, ठाणे जनता सहकारी बँकेचे अध्यक्ष विवेकानंद पत्की, अपना सहकारी बँकेचे अध्यक्ष दत्ताराम चाळके, कोकण नागरी सहकारी बँक असोसिएशन आणि अंबरनाथ जयहिंद बँकेचे अध्यक्ष विलासराव देसाई, ठाणे भारत सहकारी बँकेचे अध्यक्ष उत्तमराव जोशी, डीएनएस बँकेचे माजी अध्यक्ष उदय कर्वे, बँकेचे सभासद, खातेदार, हितचिंतक, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मधुसुदन दास पै, जनरल मॅनेजर मनोज गडकरी, जनसंपर्क अधिकारी यशवंत नाना मते, बँकेचे पदाधिकारी आणि माजी नगरसेवक, माजी महापौर, विविध बँकांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि बँकेचे कर्मचारी उपस्थित होते.
हिरा पारखण्यापेक्षा पिढा पारखणारा माणूस हा जास्त महत्वाचा असतो. जो माणूस पिढी पारखू शकतो तो माणूस खरा जीवनातला जोहरी असतो, त्या जोहरीचे काम स्वर्गीय गोपीनाथ पाटील यांनी केले. त्यामुळे ते खरे जोहरी होते, असे मत केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी यावेळी व्यक्त केले. एका खोलीत सुरु झालेली जीपी पारसिक सहकारी बँक आज वेगवेगळ्या राज्यात शेड्युल्ड बँक म्हणून कार्यरत असून बँकेच्या ९१ शाखा आहेत. हे जीपी पारसिक बँकेचे कर्तृत्व आहे. त्यामध्ये कर्मचाऱ्यांचे मोठे योगदान, प्रामाणिकपणा आहे. हा वटवृक्ष सांभाळणे सोपी गोष्ट नाही, असे मत गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केले.
जीपी पारसिक सहकारी बँकेचे संस्थापक स्वर्गीय गोपीनाथ (दादासाहेब) शिवराम पाटील (एम.कॉम.एलएलबी.) यांनी सन 1972 मध्ये कळव्यासारख्या ग्रामीण भागात 21 मे, 1972 रोजी जीपी पारसिक सहकारी बँकेची मुहूर्तमेढ रोवून पहिली शाखा सुरु केली. बँकेस 30 जानेवारी, 1998 रोजी रिझर्व्ह बँकेमार्फत शेड्युल्ड बँकेचा दर्जा प्रदान करण्यात आला आणि मार्च, 2015 मध्ये बहुराज्यीय म्हणजेच मल्टी स्टेट शेड्युल्ड बँकेचा दर्जा प्राप्त झाला. सध्या बँकेच्या महाराष्ट्र, गोवा व कर्नाटक या तीन राज्यात एकूण 91 शाखा पूर्णत संगणकीकृत असून ऑनलाईन व ऑफसाईट एटीएम ग्राहकांच्या सेवेसाठी कार्यरत आहेत. बँकेचा आजमितीस एकूण व्यवसाय रु. 6,135 कोटी असून रु. 4287 कोटी ठेवी व रु.1848 कोटी कर्जे आहेत. बँकेचा नेट एनपीए शुन्य टक्के आहे.
बँकेने सुरुवातीपासून आजपर्यंत सातत्याने ऑडीट वर्ग “अ” राखलेला आहे. निस्वार्थ वृत्ती, आर्थिक शिस्त आणि जनतेच्या मनात निर्माण केलेला विश्वास करणे या तीन आघाड्यांवर बँके दैदिप्यमान कामगिरी बजावत प्रगतीची पुढची वाटचाल करीत आहे. बँक सर्व प्रकारचे आधुनिक डिजिटल प्रोडक्ट खातेदारांना पुरविते.
बँकेने पारदर्शकता, विश्वासर्हता, ग्राहकसेवा, उत्कृष्ठता व संघटीत कार्य या मूलतत्वांचा अंगिकार केला असून बँकेला आतापर्यंत अनेक मानाचे आणि प्रतिष्ठेचे पुरस्कार प्राप्त झालेले आहेत.
सामाजिक बांधिलकी म्हणून आजपर्यंत निरनिराळ्या सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा संस्थांना धर्मदाय निधींतून बँकेने देणग्या दिल्या आहेत. बँक केवळ सामाजिक बांधिलकी जपत नसून बँकेने निसर्गाशीही नाते जोडले आहे. झाडे लावणे व वाढविणे हे राष्ट्रीय कर्तव्य असून या विधायक विचारांनी प्रेरीत होऊन कळवे गावाच्या पूर्वेकडे असलेले ओसाड झालेले पारसिक डोंगराचे वनीकरण करण्याचे काम बँकेचे संचालक, सभासद व सेवक सतत करीत असतात. संचालक मंडळाच्या निवडणूकीत सर्व संचालकांची बिनविरोध निवड झाली. ही बिनविरोध निवड संचालक मंडळ निस्वार्थी व सेवावृत्तीचे कामकाज करीत असल्याबद्दलच्या विश्वासाची पावती आहे. बँकेचे अध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली बँकेची प्रगती होत आहे. त्यांच्यासोबत सर्व संचालकांच्या सहकार्याने बँक चांगली प्रगती करीत आहे असे, अध्यक्ष नारायण गावंड यांनी सांगितले.