नवी दिल्ली: भारतात एप्रिल-मे महिना लग्नसराईचा मानला जातो, या काळात मोठ्या प्रमाणात सोन्याच्या दागिन्यांची खरेदी केली जाते. 29 जानेवारीला सोने आणि चांदीच्या दराने उच्चांक गाठला होता. त्यानंतर मात्र सोने आणि चांदीचे दर घसरले आहेत. जानेवारीच्या तुलनेत सध्या सोन्याचे दर २६,७७८ रुपयांनी घसरले आहेत. तर, चांदीचा दर देखील एक लाख ४३,१०६ रुपयांनी कमी झाला आहे.
आयबीजेएकडून सोने आणि चांदीचे दर सोमवार ते शुक्रवार दररोज जाहीर केले जातात. 1 मे रोजी सुट्टी असल्याने गुरुवारी सोन्याचे दर जाहीर करण्यात आले होते. त्या दरांनुसार २४ कॅरेट सोन्याचा एका तोळ्याचा दर एक लाख ४८,६५२ रुपये आहे. तर, २३ कॅरेट सोन्याचा दर एक लाख ४८,०५७ रुपये इतकी आहे. २२ कॅरेट सोन्याचा एका तोळ्याचा दर एक लाख ३६,१६५ रुपये इतका आहे. १८ कॅरेट सोन्याचा एका तोळ्याचा दर एक लाख ११,४८९ रुपये इतका आहे. तर , १४ कॅरेट सोन्याचा दर ८६,९६१ इतका आहे.
आयबीजेएनुसार ३० एप्रिलला चांदीचा एका तोळ्याचा दर दोन लाख ३६,८८२ रुपये इतका होता. चांदीच्या दरामध्ये उच्चांक गाठल्यानंतर एक लाख ४३,१०६ रुपयांची घसरण झाली आहे. अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्धामुळं सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण झाली. डॉलर मजबूत होत असल्यानं गुंतवणूकदारांनी सोन्याच्या जागी डॉलरमधील गुंतवणुकीला प्रोत्साहन दिल्याचं पाहायला मिळतं. डॉलरच्या दरातील तेजीचा देखील सोन्याच्या दरावर परिणाम झाला आहे. अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्धाचा परिणाम क्रूड ऑईलच्या दरांवर होत असल्यानं, महागाई वाढत आहे. याचा देखील परिणाम सोने आणि चांदीमधील गुंतवणुकीवर झाला.
सोने आणि चांदीच्या दरात गेल्या वर्षभरात मोठ्या प्रमाणात तेजी पाहायला मिळाली होती, त्यानंतर अचानक सोने आणि चांदीच्या दरात घसरण झाली. यामुळं गुंतवणूकदारांनी सोने खरेदीऐवजी दुसरे पर्याय शोधले.
दरम्यान, सोने आणि चांदीच्या दर देशभर सर्वत्र सारखे नसतात. भारतात सोने आणि चांदीच्या दरांवर तीन टक्के जीएसटी आकारला जातो. याशिवाय प्रत्येक शहरात मेकिंग चार्जेस वेगवेगळे आकारले जातात. यामुळं सोने आणि चांदीचे दर सर्वत्र सारखे असतील असं नाही, त्यात थोडे फार बदल असू शकतात.