राज्यस्तरीय शालेय बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धा
ठाणे: दरवर्षीप्रमाणे यंदाच्याही वर्षी क्रीडा व युवक संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे तथा जिल्हा क्रीडा परिषद अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने राज्य शालेय स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
स्पर्धेचे आयोजन हे मुला-मुलींसाठी तीन वयोगटांमध्ये जिल्हा क्रीडा संकुल वाडिया पार्क अहमदनगर येथे पार पडले. वैयक्तिक तसेच सांघिक अशा दोन्ही गटांमध्ये १४, १७ आणि १९ वर्षाखालील मुला-मुलींमध्ये या भव्य अशा राज्य शालेय स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते आणि दरवर्षीप्रमाणे यंदाही ठाणेकर बॅडमिंटन खेळाडूंनी आपला दबदबा कायम ठेवत चार वैयक्तिक पदकांसोबत ज्यात दोन सुवर्णपदकांचा समावेश आहे आणि सोबतच 19 वर्षाखालील सांघिक गटांमध्ये देखील सुवर्णपदक पटकावण्याची दिमाखदार कामगिरी करून दाखवली आहे. ठाणे महानगरपालिकेच्या सय्यद मोदी बॅडमिंटन अकॅडमीमध्ये गेली अनेक वर्ष हे खेळाडू बॅडमिंटनचे धडे गिरवत आहेत.
यंदाच्या वर्षात राज्य अजिंक्यपद स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या ओम गवंडी याने अहमदनगरमध्ये आपल्या चमकदार कामगिरीने पुन्हा एकदा आपल्या खेळाची दखल घेण्यास भाग पाडले आहे 17 वर्षाखालील मुलांमध्ये वैयक्तिक गटात ओम गवंडी यांनी पहिल्या फेरीपासून आपले प्रभुत्व निर्माण करीत अंतिम सामन्यापर्यंत धडक मारली आणि या सामन्यात देखील एकहाती विजय मिळवून सुवर्णपदक आपल्या नावे केले.
गेल्या अनेक वर्षांपासून राज्यात १४ व तसेच १७ वर्षाखालील मुलींच्या वयोगटात वरचढ ठरलेली ठाणे बॅडमिंटन अकॅडमीची आर्या कोरगावकर हिने या स्पर्धेत 19 वर्षाखालील मुलींमध्ये सुवर्णपदक पटकावले.
गतवर्षी केवळ बॅडमिंटनमध्ये आपले करिअर घडवण्यासाठी ठाण्यात बॅडमिंटन अकॅडमीमध्ये प्रशिक्षण घेण्यासाठी आलेले अर्जुन बिराजदार आणि आर्यन बिराजदार यांनी या राज्य शालेय स्पर्धांमध्ये सांघिक गटात 17 वर्षाखालील मुलांमध्ये सुवर्णपदक पटकावण्याची कामगिरी केली आहे. त्याचप्रमाणे आर्यन बिराजदार याने 17 वर्षाखालील मुलांमध्ये वैयक्तिक कांस्यपदक पटकावले आहे. मनस्वी चव्हाण या उभरत्या खेळाडूने देखील 14 वर्षाखालील मुलींमध्ये उत्तम खेळाचे सादरीकरण करून कांस्यपदकाला गवसणी घातली आहे.
या स्पर्धेत पदक प्राप्त खेळाडूंपैकी आर्या कोरगावकर, ओम गवंडी, मनस्वी चव्हाण आणि आर्यन बिराजदार यांची निवड स्कूल गेम्स फेडरेशन ऑफ इंडिया या मानाच्या स्पर्धेत महाराष्ट्र राज्याच्या संघात प्रतिनिधित्व करण्यासाठी निवड झाली आहे. या स्पर्धा विजयवाडा आणि गुजरात येथे आयोजित करण्यात येणार आहेत.
या विजयाबद्दल ज्येष्ठ प्रशिक्षक व ठाणे शहर व जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष श्रीकांत वाड, अक्षय देवलकर, मयूर घाटणेकर आणि विघ्नेश देवळेकर तसेच क्रीडा अधिकारी मिनल पालांडे व ठाणे बॅडमिंटन अकॅडमीच्या संपूर्ण टीमने आणि ठाणे जिल्हा क्रीडाधिकारी यांनी देखील या खेळाडूंना शुभेच्छा दिल्या आहेत.