सासऱ्याने केलेल्या गोळीबारात सुनेचा मृत्यू

नाश्ता दिला नाही म्हणून…

ठाणे: नाष्टा दिला नाही या रागातून 76 वर्षाच्या सासऱ्याने सुनेला गोळी मारून ठार मारल्याची घटना ऋतु पार्क परिसरात घडली असून फरार सासऱ्याचा पोलीस शोध घेत आहेत.

सीमा पाटील (४२)असे मृत पावलेल्या सुनेचे नाव आहे तर काशिनाथ पाटील (७६)असे सासऱ्याचे नाव आहे. ऋतु पार्क परिसरात श्री. पाटील हे पत्नी, दोन मुले, दोन सुना असे कु टुंबासह राहतात. काल १४ एप्रिल रोजी ११.३०च्या दरम्यान त्यांची सून सीमा हिच्याकडे नाश्ता मागितला होता. त्यावेळी सीमा यांनी दरदिवशी तुम्हाला आम्ही नाश्ता-चहा देतो, तरी देखील तुम्ही लोकांना आमच्याबद्दल खोटे का सांगता, त्यामुळे आमची बदनामी होते असे बोलल्याने त्याचा राग काशिनाथ पाटील यांना आला. त्यावरून दोघांमध्ये वाद झाला आणि काशीनाथ पाटील यांनी त्यांच्याकडे असलेल्या परवानाधारक रिव्हॉल्व्हरमधून सीमा यांच्या पोटावर गोळी झाडली. रक्तबंबाळ झालेल्या सीमा याना ज्युपिटर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी राबोडी पोलीस ठाण्यात काशिनाथ पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोळ्या झाडून ते घरातून पसार झाले. त्यांचा राबोडी पोलीस शोध घेत आहेत, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष माटेकर यांनी दिली

काशिनाथ पाटील हे पूर्वी बांधकाम व्यावसायिक होते. त्यांच्याकडे रिव्हॉल्व्हरचा परवाना आहे. मागील सात ते आठ वर्षांपासून ते त्यांच्या पत्नीबरोबर बोलत नाहीत.
त्यांना दोन मुले असून त्यांचा हॉटेल आणि बांधकाम व्यवसाय आहे. काल ही घटना घडली तेव्हा सीमा यांचे पती बाहेर गेले होते, असे देखील श्री. माटेकर यांनी सांगितले. या गुन्ह्याचा पुढील तपास राबोडी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अविनाश येवले करत आहेत.