अंबरनाथ : अंबरनाथच्या आनंदनगर एमआयडीसीतील वापरातील पुठ्ठ्यावर पुर्नप्रक्रिया करणाऱ्या पेपर मिलच्या गोडावूनला रविवारी मध्यरात्री भीषण आग लागल्याची घटना घडली आहे
अग्निशमन दलाच्या सात वाहनांच्या पथकांकडून प्रयत्न करूनही बारा तास लागलेली आग धुमसत होती. तर कंपनीच्या गोडावूनमध्ये ठेवलेला शेकडो टन पुठ्ठा जळाल्यामुळे त्यातून निर्माण झालेली राख संपूर्ण एमआयडीसील रस्ते, पार्कींगमधील वाहने, झाडे अशा सर्वच परिसरात पसरली आहे.
अंबरनाथ आनंदनगर एमआयडीसीत पद्मावती पेपर मिल कंपनीत पुठ्यांचा साठा करत त्यावर पुनर्प्रक्रिया केली जाते. त्यासाठी कंपनीच्याच आवारात पुठ्ठे ठेवण्यासाठी गोडावून तयार करण्यात आले आहेत. रविवारी मध्यरात्री एक ते दीड वाजण्याच्या दरम्यान अचानक कंपनीच्या गोडावूनला आग लागली. त्यामुळे पद्मावती कंपनीतील आगीच्या प्रकाशाने शेजारी असलेली रासायनिक कंपनी आणि इतर काही कंपन्यांमध्ये एकच खळबळ उडाली.
आग लागल्याचे वृत्त मिळताच एमआयडीसी अग्निशमन दल, अंबरनाथ, उल्हासनगर आणि बदलापूर अग्निशमन दलाच्या सात वाहनांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र मोठ्या प्रमाणात असलेले पुठ्ठ्याच्या साठ्यामुळे आग वाढतच होती. आज सोमवारी पहाटेपर्यंत काही प्रमाणात या आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले होते. मात्र दुपारी एक वाजेपर्यंत एमआयडीसी अग्निशमन दलाचे जवान आग विझवण्याचे काम पूर्ण करत असल्याची माहिती एमआयडीसी अग्निशमन विभागाचे प्रमुख वाय. नलावडे तसेच बदलापूरचे अग्निशमन दलप्रमुख भागवत सोनोने यांनी दिली.
आग नेमकी कशामुळे लागली याबाबत माहिती मिळू शकलेली नाही. या घटनेत कुठलीही जीवीतहानी झाली नाही. मात्र गोडावूनमधील मालमत्तेचे लाखो रूपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. कंपनीत लागलेल्या आगीमुळे हजारो टन पुठ्ठा जळून खाक झाला. त्यामुळे त्यातून उडणारी राख सोमवारी सकाळी एमआयडीसी आणि परिसरात पसरली होती. एमआयडीसीतील अनेक रस्ते, त्यावर उभी असलेली वाहने, कंपन्यांच्या छतावर, झाडांवर बर्फवृष्टीप्रमाणे राखेची वृष्टी होत असल्याने गोंधळ निर्माण झाला होता.