वीट भट्टीवरच्या मुलांसाठी जि.प.शाळेचा ज्ञानयज्ञ

* शाळेत जायला सायकल
* वर्गाला ६० इंच टच स्क्रीन टीव्ही

बदलापूर: बदलापूर जवळच्या ग्रामीण भागात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना शाळेत पोहचण्यासाठी करावी लागणारी पायपीट आता संपणार आहे. यापुढे पायपीट करत नव्हे तर सायकलवर रपेट मारत ही मुले शाळेत पोहचणार आहेत. त्यामुळे निश्चितच विद्यार्थ्यांमध्ये शाळेची गोडी वाढण्यास मदत होणार आहे. येत्या काही दिवसात बदलापूर जवळच्या कासगाव जिल्हा परिषद शाळेत हे चित्र पाहायला मिळणार आहे.

बदलापूर जवळच्या कासगावं जिल्हा परिषद शाळेत इयत्ता आठवी पर्यंत शिक्षणाची सोय आहे. कासगाव प्रमाणेच जवळील गोरेगाव वाडी, कासगांव वाडी, कोपऱ्याची वाडी, चिंचवली वाडी व या भागात असलेल्या विट भट्टीवर काम करणाऱ्या कामगारांची मुले या शाळेत शिक्षण घेत आहेत. या शाळेत पुरेसे शिक्षक उपलब्ध व्हावेत यासाठी पालकांनी सातत्याने प्रयत्न करूनही या शाळेला पुरेसे शिक्षक मिळालेले नाहीत. त्यामुळे नाईलाजास्तव पालकांनी लोकवर्गणी काढून दोन महिला शिक्षक नेमल्या असून त्या पहिली ते तिसरी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना शिकवत आहेत. तर ग्रामपंचायतीच्या माध्यमातून ८ वी च्या वर्गासाठी एक शिक्षक नेमण्यात आले आहेत. शाळेला शिक्षक मिळण्यासाठी धडपडणाऱ्या पालकांनी शाळेतील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण व इतर सोयीसुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठीही प्रयत्न सुरू ठेवले असून त्यांच्या या प्रयत्नांना यश येऊन या शाळेतील विद्यार्थ्यांना आता डिजिटल शिक्षणा बरोबरच, सभागृह व दूरच्या विद्यार्थ्यांसाठी सायकलीही उपलब्ध होणार आहेत.

इंटेग्रिओन मॅनेज सोल्यूशन्स, मुंबई व ज्ञानकमल शिक्षण संस्था,वांगणी यांच्या संयुक्त विद्यमाने सीएसआर उपक्रमाअंतर्गत कासगांव जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना या सोयीसुविधा उपलब्ध होणार आहेत. ज्ञानकमल शिक्षण संस्थेच्या अध्यक्ष प्रा.मनिषा बैकर व सचिव नामदेव बैकर यांच्या प्रयत्नांमळे सीएसआर उपक्रमाअंतर्गत कासगाव जिल्हा परिषद शाळेत शौचालय तसेच सभागृहाची उभारणी करण्यात आली आहे. डिजिटल शिक्षणासाठी ४ संगणक उपलब्ध करून देण्यात आले असून प्रत्येक वर्गासाठी ६० इंची टच स्क्रीन टिव्ही उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना बुट व मोजे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्याशिवाय ६० विद्यार्थ्यांना सायकल वाटप करण्यात येणार आहे. आमदार किसन कथोरे ,पंचायत समितीचे बीडीओ नरसिंग परदेशी आदींच्या उपस्थितीत लवकरच हा कार्यक्रम होणार असल्याची कासगाव जि. प. शाळा व्यवस्थापन समिती सदस्य राकेश टेंबे यांनी दिली. शाळेतील अनेक विद्यार्थी शाळेपासून सुमारे दोन-चार किमी अंतरावर राहतात. गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना खाजगी वाहनाचा प्रवास परवडणारा नसतो. या विद्यार्थ्यांची सायकलमुळे  वेळेवर शाळेत पोहचणे शक्य होणार आहे. त्याचा या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीवर सकारात्मक परिणाम होईल, असा विश्वासही टेंबे यांनी व्यक्त केला.