कोकणच्या दशावतारी नाटकाला रसिकांचा उदंड प्रतिसाद
ठाणे : ठाण्यातील मालवणी महोत्सवात सोमवारी कोकणची परंपरा असलेल्या दशावतार नाटकाची अनुभूती रसिकांना अनुभवता आली. कुडाळच्या श्री वावळेश्वर दशावतार नाट्य मंडळाने सादर केलेल्या “हर्षली अयोध्या नगरी” या नाट्यप्रयोगाला रसिक प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभला.
ठाणे शहरातील शिवाई नगर, उन्नती गार्डन मैदानात कोकण ग्रामविकास मंडळ आयोजित “मालवणी महोत्सव २०२४” चे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवामध्ये सोमवार ५ फेब्रुवारी रोजी रात्रौ श्री वावळेश्वर दशावतार नाट्य मंडळ तेंडोली, कुडाळ यांचा “हर्षली अयोध्या नगरी” हा नाटयप्रयोग सादर करण्यात आला. प्रजादक्ष राजा, नारद, यक्ष आणि वनवासी कन्या अशा विविधांगी भूमिका शैलीदार रंगभुषा केलेल्या पुरुषांनी साकारल्या होत्या. काल्पनिक कथानक असलेल्या या पौराणिक नाट्यपुष्पाद्वारे अयोध्येतील प्रभु श्रीरांचे दर्शन घडल्याने रसिकही भारावुन गेले. मध्यरात्रीपर्यंत चाललेल्या या दशावतारी नाटकाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभला.
यावेळी नाटकाला आवर्जुन उपस्थित असलेल्या आयोजक सीताराम राणे यांनी, कोकणातील परंपरा आणि मनोरंजनाचा महत्वाचा भाग असलेले दशावतारी नाटक महोत्सवात सादर केल्याचे सांगितले. तर, मालवणी महोत्सवाचे यंदा २५ वे वर्ष असल्याने ११ फेब्रुवारीपर्यंत अनेक वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रम तसेच खाद्यसंस्कृती या महोत्सवात असल्याने रसिक, खवय्यांनी मालवणी महोत्सवाला आवर्जुन भेट देण्याचे आवाहन केले.