दहावीच्या परीक्षेत मुली हुश्शार

ठाणे जिल्ह्याचा दहावीचा निकाल ९७.१३ टक्के

ठाणे : माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र परीक्षा मार्च २०२२ अर्थात दहावीचा निकाल शुक्रवारी दुपारी जाहीर झाला. ठाणे जिल्ह्याचा ९७.१३ टक्के निकाल लागल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी ललिता दहितुले यांनी दिली. जिल्ह्यात यंदा एक लाख १३,८२५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून उत्तीर्ण टक्केवारीत मुलींनी बाजी मारली आहे.

यंदा एक लाख १७,१८३ विद्यार्थी परीक्षेस बसले होते, त्यापैकी एक लाख १३,८२५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यामध्ये ५५,४७३ मुली परीक्षेस बसल्या होत्या, त्यापैकी ५४,३९० मुली उत्तीर्ण झाल्या. तर ६१,७१० मुले परीक्षेस बसले होते, त्यापैकी ५९,४३५ मुले उत्तीर्ण झाले. त्यामुळे यंदाच्या निकालात मुलींची उत्तीर्ण टक्केवारी ९८.०४ टक्के असून मुलांची उत्तीर्ण टक्केवारी ९६.३१ टक्के आहे. त्यामुळे मुलांच्या तुलनेत मुलींची उत्तीर्ण टक्केवारी अधिक असल्याचे निकालावरून स्पष्ट झाले.

या शाळांत परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे जिल्हा परिषद अध्यक्ष पुष्पा पाटील, जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भाऊसाहेब दांगडे, उपाध्यक्ष सुभाष पवार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रुपाली सातपुते, माध्यमिक शिक्षणाधिकारी ललिता दहितुले यांनी अभिनंदन केले.

मागील ११ वर्षातील आकडेवारी

2011 : 88.39
2012 : 88.87
2013 : 88.90
2014 : 89.75
2015 : 93.01
2016 : 91.42
2017 : 90.59
2018 : 90. 51
2019 : 78.55
2020 : 96.61
2021 : 99.28

ठाणे शहरात ९७ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण

माध्यमिक शालांत परीक्षेत ठाणे शहरातून ९७.१५टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून शहरात देखील मुलींनीच बाजी मारली आहे. ९८.०२टक्के मुली या परीक्षेत यशस्वी झाल्या आहेत.

दहावीच्या परीक्षेसाठी ठाणे महापालिका हद्दीतील १३,४३६ मुलगे आणि १२,१०१ मुली असे एकूण २५,५३७ विद्यार्थी परीक्षेला बसले होते, त्यापैकी १२,९४९ मुलगे आणि ११,८६२ मुली असे एकूण २४,८११जण परीक्षेत उतीर्ण झाले आहेत. मुलींची टक्केवारी ९८.२ टक्के तर मुलांची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ९६.३७ टक्के इतकी आहे. शहरांत एकूण ९७.१५ टक्के विद्यार्थी यशस्वी झाले आहेत.

कर्करोगाशी लढत दिव्याचे दहावीत घवघवीत यश

कोरोनासारख्या महामारीत नववी व दहावीला एकही दिवस शाळेत जाता आले नाही. त्याचवेळी कर्करोगाशी लढा देत दिव्या पवळे हिने दहावीच्या परीक्षेत ८१ टक्के गुण मिळवत घवघवीत यश मिळवले. ती नौपाड्यातील सरस्वती शाळेची विद्यार्थिनी आहे.

दिव्याच्या संघर्षाचे कौतुक ठाण्यात होत आहे. एप्रिल 2021 मधे दमछाक व सुक्या खोकल्यामुळे दिव्या त्रस्त होती. कोरोनाची चाचणी केली असता ती निगेटिव्ह आली. त्यानंतर सिटी स्कॅन केल्यानंतर कर्करोगाचा अंदाज व्यक्त केला. ज्युपिटरमध्ये दाखल करून तिच्यावर १० दिवस उपचार करण्यात आले. नंतर टाटा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू करण्यात आले. जवळ जवळ नऊ महिने केमोथेरपी सुरू करण्यात आली. या दरम्यान १४ वेळा रक्त व १५ वेळा पांढऱ्या पेशींची गरज तिला पडली. अशा कठीण परिस्थितीमध्ये दहावीची परीक्षा देणारच असा ठाम निर्धार दिव्याने केला.

आजारपणात तिला शाळेत जाता आले नाही. फक्त परीक्षेआधी १५ दिवस क्लासला उपस्थित राहून व कधी घरी तर कधी दवाखान्यात अभ्यास केला. परीक्षा सुरू झाली तेव्हा दुष्काळात तेरावा महिना या प्रमाणे दिव्याला शेवटच्या तीन पेपरच्या वेळी नागीणची लागण झाली. अशा प्रकारे दोन वेदनादायी आजारांवर उपचार चालू असताना दिव्याने दहावीत ८१ टक्क्यांनी घवघवीत यश मिळवले. तिच्या यशाचे आणि महत्वाकांक्षेचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.