Thanevaibhav Online
14 September 2023
भिवंडी: शहरातील शांतीनगर भागात अरूंद रस्त्यांमुळे झालेल्या रिक्षा अपघातात एका सात वर्षाच्या निष्पाप मुलीचा मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात शोककळा पसरली आहे. रस्ता रूंदीकरण न झाल्याने आणि पथविक्रेत्यांच्या अतिक्रमणामुळे हा मृत्यू ओढवल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
या बाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्थानिक शांतीनगर परिसरातील गौसिया मशिदीजवळ राहणाऱ्या मुनव्वर सामी अन्सारी यांच्या दोन मुली नेहमीप्रमाणे आज सकाळी पावणे बारा वाजता महापालिकेच्या शाळा क्रमांक ७९ मध्ये जात होत्या. दोघेही शांतीनगर येथील भाजी मंडईजवळ येताच भरधाव वेगात आलेल्या टेम्पोने (एमएच.०४.केएक्स २१७४) सात वर्षीय आयरा मुनव्वर अन्सारी (७) हिला चिरडले. या घटनेत ती मुलगी गंभीर जखमी झाली असून स्थानिक लोकांनी तिला तातडीने इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेले. तेथे उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.
शांतीनगर पोलिसांनी टेम्पो चालक अब्दुल वद्दू अमिरुल्ला खान (२८) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.