बेनिट कम्युनिकेशनकडून जीआयसीचा पराभव

ठाणेवैभव करंडक स्पर्धा

ठाणे : ठाणेवैभव करंडक स्पर्धेच्या क गटातील पहिल्या फेरीत गुरुवारी झालेल्या सामन्यात बेनिट कम्युनिकेशनने जीआयसी संघाचा नऊ गडी राखून पराभव केला.

बेनिट कम्युनिकेशनने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. बेनिट कम्युनिकेशनच्या गोलंदाजांच्या माऱ्यापुढे जीआयसी संघाचा सुमित सेलोकार (५२) आणि किरण डी (३१) हे दोन फलंदाज वगळता अन्य एकाही फलंदाजाला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. विकास यादव आणि आनंद यादव यांनी प्रत्येकी १५ धावा घेतल्या तर अन्य फलंदाजांना दोन आकडी धावसंख्येपर्यंत मजल मारता आली नाही. बेनिट कम्युनिकेशनच्या सागर मुळ्ये याने सात षटकांत २२ धावा देत तीन बळी मिळवले. तर पार्थ चंदन, अद्वय शिदये आणि प्रथमेश बेलचडा यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले. अवघ्या २५.३ षटकांत जीआयसी संघ ११३ धावा करून तंबूत परतला.

जीआयसी संघाचे ११३ धावांचे आव्हान बेनिट कम्युनिकेशनने सहज पेलले. फक्त १०.२ षटकांत एक गडी गमावून बेनिट कम्युनिकेशनने ११४ धावा करत सामना सहज खिशात घातला. बेनिट कम्युनिकेशनतर्फे सुशांत कदम याने ४२ धावा केल्या. सेलोकारने त्याला तंबूत धाडल्यानंतर दीपक भोगले याने २५ धावा केल्या. त्याला इजा झाल्यानंतर अद्वय शिदये आणि प्रथमेश बेलचडा यांनी अनुक्रमे नाबाद २४ आणि १८ धावा करत बेनिट कम्युनिकेशनला विजयाकडे नेले.