घोडबंदर रोड कोंडीमुक्त होणार; सेवा रस्ते मुख्य रस्त्यात सामावणार

ठाणे: घोडबंदर रोडवरील वाहतुक कोंडी दूर होण्याकरिता दोन्ही बाजूला असलेल्या ९-९ मीटरच्या सेवा रस्त्यांचा समावेश मुख्य रस्त्यामध्ये करण्याचा निर्णय आमदार प्रताप सरनाईक आणि आयुक्त अभिजित बांगर यांच्या बैठकीत झाला. यामुळे मुख्य रस्ता आणखी रुंद होणार असला तरी सेवा रस्त्यांलगत असणाऱ्या शाळा, गृहसंकुले, चाळी आणि त्यातील वाहनांची अडचण आणखी वाढण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे.

ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील कापूरबावडीपासून गायमुखपर्यंत मेट्रोचे काम सुरू असून या कामामुळे या भागात नागरिकांना प्रचंड वाहतुककोंडीला सामोरे जावे लागत आहे. त्यामध्ये बऱ्याचदा खासगी वाहनांसह फायर ब्रिगेडच्या गाड्या आणि रुग्णवाहिकाही अडकतात. आगीसारखी एखादी दुर्घटना घडल्यास अथवा रूग्णवाहिकेमध्ये अत्यवस्थ रूग्ण असल्यास त्याला नाहक जीव गमवावा लागतो. घोडबंदर रोडहून इच्छितस्थळी जाण्यासाठी कुठलाही पर्यायी मार्ग नसल्याने या रोडवरील वाहतुककोंडीमुळे कमीत-कमी अंतरासाठी अर्धा ते एक तासाचा कालावधी लागत आहे.

या भागातील नागरिकांनी लोकप्रतिनिधी या नात्याने आमदार प्रताप सरनाईक यांना या गोष्टीची दखल घेण्यास सांगितली असता त्यांनी काही कार्यकर्त्यांसह कापूरबावडीपासून गायमुखपर्यंत सर्वेक्षण केले असता असे निर्दशनास आले की, घोडबंदर रोडवर १ बीएचके मध्ये राहणाऱ्या नागरिकांकडे सुद्धा चारचाकी वाहने असून मोठ्या प्रमाणात पार्किंगची समस्या असल्यामुळे महानगरपालिकेच्या माध्यमातून करण्यात आलेल्या ९ मीटर सर्व्हिस रोडचा वापर रस्त्याजवळील दुकानदार व काही खाजगी गाड्या तसेच टेम्पो, ट्रक, ऑटो रिक्क्षा पार्किंगसाठी केला जातो, त्यामुळे तेथे पार्किंग प्लाझा उभारणे गरजेचे आहे. तसेच सर्व्हिस रोडवर असलेल्या पार्किंगमुळे वाहनचालक सर्व्हिस रोडचा वापर न करता मुख्य रस्त्याचाच वापर करीत असून सर्व्हिस रोडच्या बाजूला असलेल्या गटारावरील ५ ते ६ फुट असलेल्या फुटपाथचा वापर पादचार्यांना होत नसल्याचे निर्दशनास येत आहे.

जर दोन्हीं बाजूच्या ९-९ मीटरचा सेवा रस्ता घोडबंदरच्या मुख्य रस्त्याला जोडल्यास व मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूला दोन-दोन मीटरचा पदपथ केला तर पादचाऱ्यांना आणि वाहनचालकांना पदपथ आणि रस्त्याचा वापर करता येईल. हा अतिरिक्त १४ मीटरचा सेवा रस्ता घोडबंदर मार्गाला जोडल्यास तेथील वाहतूक कोंडी सुटेल. तसेच स्थानिक नागरिक रस्त्यावर पार्किंग करीत असल्यामुळे त्यांच्यासाठी कापूरबावडीपासून गायमुखपर्यंत ६ ते ७ पार्किंग प्लाझाची निर्मिती करावी, असे आमदार प्रताप सरनाईक यांनी आयुक्तांना सुचविले.

या कामासाठी ५० ते ६० कोटी खर्च येणार असून हा पर्यायी मार्ग करीत असताना एकदाच पूर्ण १४ मीटरचा रस्ता सिमेंट काँक्रिटीकरणाच्या माध्यमातून केल्यास नागरिकांचा प्रवास खड्डेमुक्त होईल, असे सरनाईक म्हणाले.

सेवा रस्त्यांचा समावेश करणे कठीणच

घोडबंदर सेवा रस्त्यांचा मुख्य रस्त्यांमध्ये समावेश करण्यासंदर्भात विचार करण्यात आला असला तरी, प्रत्यक्षात मात्र ही योजना कठीण असल्याचे बोलले जात आहे. घोडबंदरच्या दोन्ही बाजूला असलेल्या सेवा रस्त्यांवर शाळा तसेच अनेक गृहसंकुले आहेत. या सेवा रस्त्यांवर अनेक छोटी वाहनांची वर्दळ सुरु असते. तसेच पादचारी देखील सेवा रस्त्यांचा चालण्यासाठी मोठ्या प्रमाणात वापर करतात. विशेष म्हणजे काही ठिकाणी मेट्रोचे पिलर देखील आले असून याचे नियोजन कसे होणार याबाबत अद्याप स्पष्टता आलेली नाही. ठाणे महापालिकेच्या विकास आराखड्यात घोडबंदर येथील सेवा रस्त्यांचा समावेश करण्यात आलेला नाही. मात्र त्यानंतर वाहतूक विभागाचा अभिप्राय आणि इतर अनुषंगिक गोष्टी पूर्ण झाल्यानंतर चित्र स्पष्ट होणार असल्याची माहिती पालिका सूत्रांनी दिली आहे.