मालमत्ता कर भरण्यात घोडबंदरवासी सर्वात पुढे

ठामपाच्या एकूण वसुलीपैकी
३२ टक्के वाटा माजिवडे-मानपाड्याचा

घोडबंदरवासींनी ठाणे महापालिकेचा सर्वाधिक मालमत्ता कर २३२ कोटी भरून प्रामाणिक करदाते असल्याचे दाखवून दिले आहे. मागील वर्षात महापालिकेच्या तिजोरीत मालमत्ता कराच्या माध्यमातून ७२० कोटी जमा झाले आहेत

मागील आर्थिक वर्षात ठाणे महापालिकेच्या मालमत्ता कर विभागाने सर्वाधिक ७२० कोटी इतका कर गोळा केला आहे. त्यामध्ये सर्वात मोठा वाटा हा माजिवडे-मानपाडा प्रभाग समितीचा आहे. या समितीला २३२.५९ कोटी इतके उद्दिष्ट दिले होते. या समितीने २३२ कोटी इतका मालमत्ता कर वसूल केला आहे. दुसऱ्या क्रमांकावर वर्तकनगर प्रभाग समिती असून त्यांनी १०५ कोटी ९२ लाख इतका कर गोळा केला आहे. या समितीला १०७ कोटीचे उद्दिष्ट दिले होते. सर्वात कमी मालमत्ता कर वसुली मुंब्रा प्रभाग समितीमधून झाली आहे. या समितीला ४३ कोटीचे लक्ष्य दिले असताना या समितीने केवळ ३१ कोटी २१ लाख इतकीच वसुली केली आहे.

८६.४२ कोटी इतकी वसुली नौपाडा-कोपरी प्रभाग समितीने केली असून त्यांना ९४ कोटीचे उद्दिष्ट दिले होते. उथळसर प्रभाग समितीने ४६.७८ कोटी इतकी वसुली केली आहे. त्यांना ५० कोटीचे लक्ष्य दिले होते. दिवा प्रभाग समिती क्षेत्रातील कर्मचाऱ्यांनी ४० कोटी ७७ लाख वसुली केली आहे. या समितीला ४५ कोटीचे उद्दिष्ट देण्यात आले होते. २६ कोटी ९१ लाख वसुली कळवा प्रभाग समितीने केली असून या समितीला ३१ कोटींचे उद्दिष्ट दिले होते. वागळे इस्टेट प्रभाग समितीने अवघे २३ कोटी १८ लाख वसुली केली असून या समितीला २८ कोटीचे लक्ष्य दिले होते. ३० कोटी ६७ लाख इतकी वसुली लोकमान्य-सावरकर प्रभाग समितीने केली असून त्यांना ३२ कोटीचे लक्ष्य देण्यात आले होते. मुख्यालयात ९७ कोटी ३३ लाख मालमत्ता कर जमा करून घेण्यात आला आहे. मुख्यालयाला ९१ कोटीचे लक्ष्य देण्यात आले होते.

याबाबत कर निर्धारक आणि संकलक जी. जी. गोदापुरे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग समितीमधील अधिकारी आणि कर्मचारी यांनी मालमत्ता कराची देयके वेळेवर अदा केली. थकबाकीदार ग्राहकांवर लक्ष केंद्रित करून वसुली करण्यात आली होती. ठाणेकर ग्राहकांनीही वेळेवर कर भरून आपले कर्तव्य पार पाडले, त्यामुळेच लक्ष्यापेक्षा जास्त वसुली करण्यात आली, असे गोदेपुरे यांनी सांगितले.